भीषण अपघात : भरधाव ट्रकची अ‍ॅपे रिक्षाला धडक, 5 जणांचा मृत्यू, 6 गंभीर जखमी

टीम AM : राज्यभरात रामनवमीचा उत्साह असतानाच नांदेड मधून एक भीषण घटना समोर आली आहे. भरधाव येणाऱ्या ट्रक आणि अ‍ॅपे रिक्षाची धडक झाली.

या अपघातात अ‍ॅपे रिक्षाचा चक्काचूर झाला. गंभीर बाब म्हणजे अपघातात चार जण जागीच ठार झाले. तर आणखी एक जण उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला. या घटनेतील अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

कुठे घडली घटना?

नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटी जवळ आज सकाळीच हा अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने ॲपे रिक्षाला धडक दिली. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. मुदखेडकडून नांदेडकडे येणाऱ्या ॲपे रिक्षाला ट्रकने धडक दिली. या ॲपे रिक्षामध्ये जवळपास 15 प्रवाशी होते. हे सर्व जण वाजेगाव येथे मजुरीसाठी जात होते. नांदेड कडून भरधाव येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने या रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात 4 जणांचा जागीच तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 6 जण गंभीर जखमी झाले असून जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृतांची नावे

  • रमेश भोई, वय वर्षे 40 रा. मेहकर, बुलढाणा
  • गाली कल्याण भोई, वय वर्षे 24 रा. गेवराई, जि. बीड
  • जोयल कल्याण भोई, वय वर्षे 7 महीने
  • जेष्ठ नागरिक वय 70, यांची आणि अन्य एका व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही.