पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विभागीय पुरस्कार देवीकृपा महिला सेवाभावी संस्थेला प्रदान

टीम AM : महिला व बाल विकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल येथील देवीकृपा महिला सेवाभावी संस्थेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विभागीय पुरस्कार राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा ऐश्वर्या टाक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

पुणे येथील हॉटेल लेमन ट्री मध्ये दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

यावेळी महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त आर. विमला, उपायुक्त राहुल मोरे, उपायुक्त दिलीप हिवराळे, विभागीय उपायुक्त संजय माने, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

देवीकृपा महिला सेवाभावी संस्थेने सन 2014-15 मध्ये राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण जनजागृती अभियान राबविले होते. त्यासोबतच महिलांच्या उन्नतीसाठी, त्यांना बचत गटांच्या माध्यमातून विविध लघु उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन शिबीरे आयोजित केली होती.

मोबाईलमुळे बालकांवर होणारे दुष्परिणाम आणि प्लास्टिक मुक्तीसाठी जनजागृती या केलेल्या कामांची दखल घेऊन महिला व बालविकास विभागातर्फे संस्थेला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र आणि 25 हजार रुपये असे आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेच्या सचिव नंदा टाक यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.