अंबाजोगाई : जयवंती नदीच्या पात्रातील अतिक्रमणे काढून तिचे पुनर्जीवन, संवर्धन व सुशोभीकरण करा, यासह विविध मागण्यांसाठी जयवंती नदी बचाव कृती समितीच्या वतीने बुधवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीने आपल्या मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांना दिले.
जयवंती नदीचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी या नदीचा समावेश शासनाच्या नदी संवर्धन व पुनर्जीवन – चला जानूया नदीला या योजनेत समावेश करावा. नदीपात्रात सुरू असलेली कामे बंद करावीत. नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्यात यावीत. समितीच्या सदस्यांसोबत प्रशासकीय यंत्रणेने परिक्रमा करून, सर्व पाहणी करून अहवाल तयार करावा, अशा विविध मागण्या या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत.
आजच्या या धरणे आंदोलनात समितीचे सुनिल जगताप, शैलेश कांबळे, राजेश वाहुळे, गजानन मुडेगांवकर, सुधाकर देशमुख, गोविंद मस्के, परमेश्वर जोगदंड, सचिन चव्हाण, अशोक गंडले यांच्यासह समितीचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.