टीम AM : बॉलिवूडमधील दमदार अभिनेत्यांपैकी एक अशी अक्षय खन्ना चीओळख आहे. या अभिनेत्याचे बऱ्यापैकी चित्रपट फ्लॉप ठरले असले, तरी त्याने आपल्या अभिनयाने एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत अक्षय खन्नाचं नाव आवर्जून घेतलं जातं. या अभिनेत्याने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांसह समीक्षकांनाही प्रभावित केलं आहे.
अक्षय खन्ना हा ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. अफाट प्रतिभा आणि एक प्रसिद्ध स्टारकिड असूनही, या अभिनेत्याला इंडस्ट्रीत हवं तसं यश मिळू शकलं नाही. आज अक्षय आपला 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने अभिनेत्याबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.
विनोद खन्ना हे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीत गणले जातात. त्यामुळे त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा पडद्यावर काय कमाल करणार, याकडे सर्वांचं लक्ष होतं. सुरुवातीचे काही वर्ष तसं झालंही. मात्र कालांतराने तो पडद्यावरुन गायब झाला होता.
अक्षय खन्नाने 1997 मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्याचे वडील आणि ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांनी केली होती. जरी ‘हिमालय पुत्र’ बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी दाखवू शकला नसला तरी या चित्रपटाने इंडस्ट्रीचे दरवाजे अभिनेत्यासाठी खुले केले होते. या चित्रपटानंतर अक्षय खन्नाला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या होत्या.
प्रत्येक अभिनेत्याला एक असा सिनेमा हवा असतो, जो त्याच्या करिअरला वेग देईल. अक्षय खन्नालासुद्धा असा एक सिनेमा मिळाला होता. आणि तो सिनेमा होता ‘बॉर्डर’. अक्षय खन्नाला इंडस्ट्रीत खरी ओळख ‘बॉर्डर’ या चित्रपटातून मिळाली होती.
विशेष म्हणजे मल्टिस्टारर चित्रपट असूनही अक्षय खन्नाने आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या चित्रपटासाठी अक्षय खन्नाला पुरस्कारसुद्धा मिळाला होता. शिवाय ‘हमराज’ चित्रपटात अक्षय खन्ना नकारात्मक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटातही अभिनेत्याने आपल्या अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली होती. मुख्य भूमिकेत दिसलेल्या बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेपेक्षाही अक्षय खन्नाचं पात्र अधिकभाव खाऊन गेलं होतं.
अक्षय खन्नाचं व्यावसायिक आयुष्य सर्वांनाच माहिती आहे. मात्र अभिनेत्याच्या खाजगी आयुष्याबाबत फारच कमी लोकांनां माहिती असेल. खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, अक्षय खन्नाने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. करिअरच्या सुरुवातीच्या काळात या अभिनेत्याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. मात्र लग्न कोणासोबतच नाही झालं. फार कमी लोकांना माहिती असेल की रणधीर कपूर यांना आपल्या मुलीचं म्हणजेच करिश्मा कपूरचं लग्न अक्षय खन्नासोबत करायचं होतं. ही गोष्ट घडून आली असती तर आज करिश्मा अक्षयची पत्नी असती.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणधीर कपूर यांनी विनोद खन्ना यांच्याशी लग्नाबाबत चर्चाही केली होती. पण करिश्माची आई आणि अभिनेत्री बबिता यांना हे नातं मान्य नव्हतं. तर, त्या काळात करिश्मा कपूर तिच्या करिअरच्या शिखरावर होती. तर अक्षय खन्नाच्या चित्रपटांना फारसं यश मिळत नव्हतं. यानंतर अक्षय खन्नाने त्याच्या एका मुलाखतीत सांगितलं की, त्याला आयुष्यात लग्नच करायचं नाही आणि आजही हा अभिनेता अविवाहीत आहे.