थायरॉईड : वेळीच उपचार घेवून आजारातुन बाहेर निघा – डॉ. सिध्देश्वर बिराजदार

टीम AM : थायरॉइड हा आजार आता सर्वसामान्य आजार झाला आहे. भारतातील दर 10 व्यक्तींपैकी एका व्यक्तीला हा आजार झालेला असल्याची नोंद या संदर्भातील प्रसिद्ध झालेल्या अहलालात करण्यात आली आहे. 2021 च्या आकडेवारीनुसार भारतात थायरॉइडचे 4.2 कोटी रुग्ण असल्याचे म्हटले आहे.

थायरॉइडची एक समस्या ही आहे की, हा आजार झालेल्या 1/3 व्यक्तींना, त्यांना हा आजार झाल्याची कल्पनाच नसते. त्यातल्या त्यात या आजाराचे प्रमाण महिलांमध्ये अधिक असल्याचे आढळून येते.

अलिकडे थायरॉईड हा आजार स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. थायरॉईडचे प्रमाण वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे बिघडलेली जीवन शैली. तुम्ही घरगुती उपाय करून देखील थायरॉईड नियंत्रणात आणू शकता. थायरॉईड हे गळ्याच्या पुढील भागात असणारी एक लहान आकाराची ग्रंथी असते. ह्या ग्रंथीचे कार्य शरीरातील अनेक महत्त्वाच्या क्रियांवर नियंत्रण ठेवणे हे असते. ही ग्रंथी अन्नाचे रूपांतरण ऊर्जेत करते. यासोबतच श्वास, हृदय, पचन संस्था आणि शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्याचे कार्यही करते. 

आपल्या गळ्याजवळ थायरॉइड ही महत्त्वाची ग्रंथी असते. या थायरॉइड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या अनेक महत्वाच्या क्रियांना नियंत्रित करतात. थायरॉईड ग्रंथीतून निघणारे हार्मोन्स शरीराच्या चयापचय क्रियेसाठी, शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, मेंदूच्या कार्यासाठी तसेच हृदयाची क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतात. थायरॉइड ग्रंथी ही थायरॉक्सिन (T4) आणि ट्रायोडॉथ्रोनाइन (T3) या दोन महत्त्वपूर्ण हार्मोन्सची निर्मिती करते.      

थायरॉइडच्या ग्रंथीतून जेंव्हा जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास किंवा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होत असल्यास थायरॉइडचा त्रास सुरू होतो. त्या त्रासाला थायरॉईड डिसीज असे म्हणतात. थायरॉइडच्या आजाराचे अनेक प्रकार असतात. यामध्ये हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम असे थायरॉइडचे विविध आजार होऊ शकतात.

▪️ थायरॉईडचे प्रकार 

1. हायपोथायरॉइडिझम 

2. हायपरथायरॉइडिझम 

3. गलगंड (गॉइटर)

4. थायरॉईडला सूज येणे 

5. हाशिमोटोस थायरॉईड 

स्वाराती’ रुग्णालयात रुग्णाची तपासणी करताना डॉक्टर्स..

▪️थायरॉईडमुळे काय त्रास होतो..?

जेंव्हा थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स तयार होऊ लागतात त्या स्थितीला हायपरथायरॉइडिझम असे म्हणतात तर जेंव्हा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होऊ लागतो तेंव्हा त्या स्थितीला हायपोथायरॉइडिझम असे म्हणतात. ह्या दोन्हीही स्थिती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून त्यावर वेळीच योग्य उपचारांची गरज असते.

▪️थायरॉइडची लक्षणे 

थायरॉइड त्रासाच्या प्रकारानुसार थायरॉइडची लक्षणे असतात. हायपरथायरॉइडिझम असल्यास झोपेच्या तक्रारी, दुर्बलता, वजन कमी होणे, थायरॉइडचा आकार वाढणे, अधिक गरम वाटणे, मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे अशी लक्षणे जाणवतात. तर हायपोथायरॉईडची समस्या असल्यास लठ्ठपणा, पोट साफ न होणे, थकवा, केस गळणे, थंडी अधिक जाणवणे अशी लक्षणे हायपोथायरॉइडिझम मध्ये जाणवतात.

▪️थायरॉईडचा त्रास कोणाला होऊ शकतो ?

थायरॉइडचा त्रास हा कोणत्याही वयाच्या स्त्री – पुरुषांना होऊ शकतो. मात्र स्त्रियांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, कुटुंबात थायरॉईड त्रासाची आनुवंशिकता असणे, टाईप -1 डायबेटिस रुग्ण, आमवाताचे रुग्ण, वयाच्या साठीनंतरच्या व्यक्ती यामध्ये थायरॉईडचा त्रास सुरू होण्याची शक्यता अधिक असते.

‘स्वाराती‘ रुग्णालयात महिलेची तपासणी करताना डॉक्टर्स..

▪️हायपरथायरॉइडिझम 

थायरॉइड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हार्मोन्स निर्मिती होत असल्यास हायपरथायरॉइडिझम ही थायरॉईड समस्या होते. प्रामुख्याने ग्रेव्ह्ज डिसिज नोड्युल्स, थायरॉईडला आलेली सूज, आयोडीनचा अतिवापर यामुळे थायरॉईडमधून अधिक प्रमाणात हार्मोन्सची निर्मिती होऊ लागते.

▪️‘हायपरथायरॉइडिझम’ ची लक्षणे

* झोपेच्या समस्या सुरू होणे,

* अशक्तपणा,

* वजन कमी होणे,

* थायरॉइड ग्रंथीचा आकार वाढणे,

* हात थरथरणे,

* मांसपेशी दुर्बल होणे,

* अधिक गरम वाटणे, अधिक घाम सुटणे,

* स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होणे, 

यासारखी लक्षणे हायपरथायरॉइडिझम या थायरॉईड विकारात असतात. हायपरथायरॉइडिझमवर उपचारासाठी औषधे, रेडिओऍक्टिव आयोडीन किंवा सर्जरी यांसारख्या उपचारांचा अंतर्भाव केला जातो.

▪️हायपोथायरॉइडिझम 

थायरॉइड ग्रंथीतून जेंव्हा अत्यंत कमी प्रमाणात हार्मोन्स तयार होऊ लागतो तेंव्हा हायपोथायरॉइडिझम ही थायरॉईड समस्या होते. प्रामुख्याने थायरॉईडला आलेली सूज आयोडिनची कमतरता यामुळे हायपोथायरॉइडिझम ही समस्या होते.

▪️‘हायपोथायरॉडिझम’ ची लक्षणे  

* अशक्तपणा,

* थकवा जाणवणे,

* वजन अधिक वाढणे,

* पोट साफ न होणे,

* केस अधिक गळू लागणे,

* त्वचा कोरडी पडणे,

* थंडी अधिक जाणवणे, 

यासारखी लक्षणे हायपोथायरॉइडिझम ह्या विकारात असतात. हायपोथायरॉइडिझम मध्ये शरीरात पुरेशा प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार होत नाहीत. यासाठी यावरील उपचारामध्ये शरीराला थायरॉईड हार्मोन्स पुरवण्यासाठी थॉयरॉक्झीन सारखी औषधे नियमित घ्यावी लागतात. औषधांनी पूर्णपणे हा त्रास कमी होत नाही. त्यामुळे याची औषधे आयुष्यभर घेणे आवश्यक असते. नियमित औषधे, नियमित तपासणी आणि योग्य आहार, व्यायाम याद्वारे हायपोथायरॉइडिझम हा त्रास नियंत्रित ठेवता येतो.

▪️ थायरॉईडचे निदान 

वरीलप्रमाणे लक्षणे जाणवत असल्यास आपल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. थायरॉइडच्या त्रासाचे निदान करण्यासाठी थायरॉईड फंक्शनल टेस्ट  (TFT) नावाची टेस्ट केली जाते. या टेस्टमध्ये T3, T3RU, T4 आणि TSH अशा चार चाचण्या केल्या जातात. या चाचण्यांमध्ये हॉर्मोन्सचे प्रमाण कमी किंवा जास्त दिसून आल्यास थाथायरॉइड विकार असल्याचे निदान होते. अशावेळी आपल्या डॉक्टरांकडून या त्रासावर उपचार घेणे आवश्यक असते.

▪️T3, T4 आणि TSH टेस्टचे नॉर्मल प्रमाण किती आहे ?

* T3 चे नॉर्मल प्रमाण – 80 – 200ng/dl

* T4 चे नॉर्मल प्रमाण – 4.5 – 11.7 

* mcg/dl TSH नॉर्मल प्रमाण – 0.3 – 5U / ml

▪️थायरॉईडचे परिणाम 

थायरॉईडचा त्रास हा दुर्लक्ष करण्याजोगा मुळीच नाही. थायरॉईड ग्रंथीतून येणारे हार्मोन्स मेंदू, हृदय या महत्वाच्या अवयवांच्या कार्यासाठी आवश्यक असतात. मात्र थायरॉईड ग्रंथीतून येणारे स्त्राव अधिक किंवा अत्यंत कमी प्रमाणात येत असल्यास थायरॉईडचा त्रास सुरू होतो. अशावेळी वजन अधिक वाढणे किंवा कमी होणे, झोपेच्या तक्रारी वाढणे, छातीत धडधड होणे, थकवा व अशक्तपणा येणे, मानसिक तणाव, केसांच्या समस्या, मासिक पाळीच्या तक्रारी, बद्धकोष्टता अशा अनेक समस्या थायरॉईडमुळे होतात. तसेच यामुळे थायरॉइड ग्रंथी आकाराने अधिक वाढते. या स्थितीला गलगंड (गॉइटर) असे म्हणतात. जर हायपरथायरॉडिझम वर वेळीच योग्य उपचार न केल्यास आरोग्याचे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. हायपरथॉयराडिझमचा परिणाम हृदयाच्या ठोक्यांवर होत असतो. त्यामुळे हृदयाचे विकार उद्भवतात. रक्ताची गुठळी होणे, हार्ट अटॅक, पक्षाघात (स्ट्रोक), हार्ट फेल्युअर ह्यासारख्या गंभीर स्थिती निर्माण होतात. तसेच यामुळे डोळ्यांसंबंधित होतो. यामध्ये वस्तूच्या दोन – दोन प्रतिमा दिसणे, उजेड सहन न होणे, डोळ्यांच्या ठिकाणी वेदना होणे तसेच काहीवेळा यामुळे अंधत्व ही येऊ शकते.

याशिवाय हारपरथॉयराइडिझममुळे हाडे ठिसूळ होऊन ओस्टोपोरोसीस Osteoporosis ची समस्या होते. तसेच स्त्रियांमध्ये हायपरथॉयराइडिझममुळे वंध्यत्व समस्या होतात. तर गरोदर स्त्रियांमध्ये गर्भस्त्राव व अकाली प्रसूती होणे, रक्तदाब वाढणे यासारख्या समस्या निर्माण होतात. आणि जर हायपोथॉयइडिझमचा त्रास असल्यास व त्याकडे उपचार न करता दुर्लक्ष केल्यास रक्तातील हाय कोलेस्टेरॉल वाढण्याची अधिक शक्यता असते. कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अटॅक, पक्षाघात, हाय ब्लडप्रेशर यासारख्या गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. गरोदर स्त्रीमध्ये हायपोथॉयराइडिझममुळे गर्भस्त्राव व अकाली प्रसूती म्हणजे प्री – मॅच्युअर बर्थ होण्याचा धोका वाढतो. याशिवाय गरोदर स्त्रीमध्ये ब्लड प्रेशर वाढते, पोटातील गर्भाच्या वाढीवर यामुळे परिणाम होतो. या सर्वांचा परिणाम एकूणच आरोग्यावर होऊ लागतो. त्यामुळे थायरॉईडच्या त्रासाचे निदान झाल्यास त्यावर वेळीच उपचार करणे आवश्यक आहे. 

डॉ. सिध्देश्वर बिराजदार

▪️थायरॉईडवर उपचार 

थायरॉईडचा त्रास कोणत्या प्रकारचा आहे, त्यावर याचे उपचार अवलंबून असतात. जर हायपरथायरॉइडिझम असल्यास त्यावर उपचारासाठी जास्त प्रमाणात येणारा हार्मोन्सचा स्त्राव कमी करण्यासाठी ऍन्टी थायरॉईड औषधे, रेडिओऍक्टिवआपाडीन यांसारख्या उपचारांचा वापर केला जातो. याशिवाय काहीवेळा सर्जरी करून थायरॉईड ग्रंथी काढून टाकली जाते. या थायरॉईड ऑपरेशनला थायरोइडिक्टॉमी thyroidectomy असे म्हणतात. या सर्जरीनंतर थायरॉईड हार्मोन्स शरीरात तयार होत नाहीत अशावेळी सर्जरीनंतर आयुष्यभर लिव्होथायरॉक्झीन Levothyroxine, थॉयरॉक्झीन सारखी औषधे  नियमित घ्यावी लागतात.

हायपोथायरॉइडिझम प्रकारची समस्या असल्यास या प्रकारात शरीरात पुरेशा प्रमाणात थायरॉईड हार्मोन्स तयार होत नाहीत. यासाठी यावरील उपचारामध्ये शरीराला थायरॉईड हार्मोन्स पुरवण्यासाठी Levothyroxine, थॉयरॉक्झीनसारखी औषधे दिली जातात. या औषधांनी पूर्णपणे हा त्रास कमी होत नाही. त्यामुळे ही औषधे आयुष्यभर घेणे आवश्यक असते. नियमित औषधे, नियमित तपासणी आणि योग्य आहार, व्यायाम याद्वारे हायपोथायरॉइडिझम हा त्रास आटोक्यात ठेवता येतो. 

▪️त्रास असल्यास काय काळजी घ्यावी..?

थायरॉईडचा त्रास असल्यास आपल्या डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्यावीत तसेच नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. याबरोबरच योग्य आहार, नियमित व्यायाम याद्वारे थायरॉइड विकार कंट्रोलमध्ये ठेवता येतो. थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी वर्षातून किमान एकदा थायरॉईड टेस्ट करून घ्यावी.

@ : डॉ. सिध्देश्वर बिराजदार, मेडिसीन विभाग प्रमुख, ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई.