टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाने परिघाबाहेरचे कलावंत घडवल्याचे गौरवोद्घार प्रख्यात दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले आहेत. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं विद्यापीठाच्या नाट्य महोत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
संधी मिळाली तर खूप लोकं काहीही करू शकतात, सगळ्यात टॅलेंट आहे. आपल्या सीमा ठरल्या आहेत, पण त्या परिघाबाहेर पण टॅलेंट असतं. मला नॅशनल अवॉर्ड मिळाले डिरेक्टर म्हणून. असंही शक्य आहे. तर माझं मत आहे की, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात टॅलेंट भरलेलं आहे. त्यांना संधी मिळाली पाहिजे, नवीन चेहरे आले पाहिजे, असं मंजुळे यांनी सांगितले.
दाक्षिणात्य रसिकांच्या तुलनेत कलेवरची आपली श्रद्धा कुठेतरी कमी पडते, याचा विचार मराठी माणसांनी करावा, असं आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावेळी केलं. मराठी नाट्य आणि सिनेसृष्टीला अनेक मोठे कलावंत देणाऱ्या नाट्यशास्त्र विभागाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून, या वर्षात संस्मरणीय कार्यक्रम घेऊन विभागानं राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय स्तरावर कलावंत घडवावेत, अशी अपेक्षा कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी यावेळी व्यक्त केली.