मराठवाड्यातल्या 205 अकार्यक्षम ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द

टीम AM : मराठवाड्यातल्या 205 ग्रंथालयांची शासन मान्यता रद्द करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालयाच्या वतीनं राज्यातल्या अकार्यक्षम ग्रंथालयांना नोटीस पाठवण्यात आली होती, मात्र या ग्रंथालयांनी खुलासे सादर न केल्यानं ग्रंथालय संचालनालयानं ही कारवाई केली आहे. 

सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनील हुसे यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनात या संदर्भातली माहिती दिली.

शासन मान्यता रद्द झालेल्या ग्रंथालयांमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 20, जालना 29, नांदेड आणि बीड प्रत्येकी 38, धाराशीव 19, परभणी 16, लातूर 30 तर हिंगोली जिल्ह्यातल्या 15 ग्रंथालयांचा समावेश आहे. जिल्हा ग्रंथालयांना 60 टक्के वाढीव अनुदानाची रक्कम येत्या चार ते पाच दिवसांत मिळणार असल्याचंही सहाय्यक ग्रंथालय संचालक हुसे यांनी यावेळी सांगितलं.