टीम AM : देशात सध्या इन्फ्लूएंझा सब टाईप एच 3 एन 2 आणि कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य मंत्रालय आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने शनिवारी राज्यांना एक संयुक्त ॲडव्हायजरी जारी केली आहे.
ज्यात सार्वजनिक आरोग्य उपायांचे पालन करण्यावर भर दिला गेला आहे. गर्दी टाळावी, शिंकताना अथवा खोकताना रुमाल / टिश्यूचा वापर करावा, गर्दीच्या आणि कोंदट ठिकाणी मास्कचा वापर करावा, हाताची स्वच्छता राखावी, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे, असे ॲडव्हायजरीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
राज्यांना नवीन हॉट स्पॉट्स ओळखण्यासाठी चाचण्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. कोविड – 19 आणि इन्फ्लूएंझा प्रकरणांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्वसन आणि हाताच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यास सांगितले आहे. तसेच राज्यांनी डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि इतर आरोग्यसेवा कर्मचारी तसेच रुग्ण आणि त्यांच्या सेवकांना मास्क घालण्यास सांगावे. राज्यांनी प्राथमिक लक्षणे ओळखून चाचण्यांवर भर द्यावा, असे ॲडव्हायजरीमध्ये म्हटले आहे.
फेब्रुवारी 2023 च्या मध्यापासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू पण सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आजपर्यंत देशातील सर्वाधिक सक्रिय कोविड – 19 प्रकरणे केरळ (26.4 टक्के), महाराष्ट्र (21.7टक्के), गुजरात (13.9 टक्के), कर्नाटक (8.6 टक्के) आणि तामिळनाडू (6.3 टक्के) यासारख्या राज्यांमध्ये नोंद झाली आहेत. या आजारामुळे रुग्णालयात दाखल होण्याचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी असले तरी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की रुग्णसंख्या वाढ रोखण्यासाठी आरोग्याशी संबंधित खबरदारी घेणे आवश्यक आहे.
कोरोना स्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय मॉक ड्रिलचे आयोजन
देशात Covid-19 तसेच हवामान बदलामुळे होणाऱ्या संसर्गांचे प्रमाण वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने चिंता व्यक्त केली आहे. यापार्श्वभूमीवर गर्दी असलेल्या तसेच बंद ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. केंद्र सरकारने कोरोनास्थितीचा सामना करण्यासाठीच्या उपाययोजना संदर्भात 10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय पातळीवर मॉक ड्रिलचे आयोजन केले आहे. या अनुषंगाने आरोग्य मंत्रालयाने सोमवारी राज्यांसोबत बैठक बोलावली आहे.