अंबाजोगाईत गारांचा पाऊस : सोमवारपर्यंत पावसाची शक्यता

टीम AM : राज्यात गेल्या 24 तासांत काही भागांत मेघगर्जनेसह पाऊस व गारपीट झाली आहे. अंबाजोगाई शहरासह तालुक्यातही आज दिनांक 18 मार्चला दुपारी गारांचा मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, अशी माहिती हाती आली आहे.

दरम्यान पुढील 2 दिवस विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अनेक राज्यांत पावसाची शक्यता

दरम्यान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये 20 मार्चपर्यंत गडगडाट आणि सोसाट्याचा वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील तीन दिवसांत उत्तर – पश्चिम भारत, पूर्व भारत, मध्य आणि पश्चिम भारतातील तापमानात 2 – 4 अंश सेल्सिअसने घट होईल, असा अंदाजही हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.