अंबाजोगाई : शुक्रवारी दुपारी निम्मा तालुका पावसाने अक्षरशः झोडपुन काढला. विजेचा कड़कडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. आधीच अस्मानी संकटातून शेतकरी सावरत नाही, तेच पुन्हा अवकाळीचे संकट ओढावल्याने बळीराजा पुरता हताश झाला आहे.
शुक्रवारी दुपारी अंबासाखर कारखाना, वाघाळा, राडी, कुंबेफळ, सातेफळ, ममदापुर, पाटोदा, देवळा, धानोरा या व आदी परिसरात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे गहु, हरभरा, कांदा पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे.
अंबाजोगाई तालुक्यात काही दिवसांपासून अधून – मधून ढगाळ वातावरण होते व अजुनही आहे. त्यात एक दिवस रात्री हलक्या पावसाच्या सरीही कोसळल्याने गहू, हरबरा, ज्वारी या पिकांना झोडपुन काढल्याचे वृत्त होते. शुक्रवारी शहरात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभ होते. विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे व-हाडी मंडळींची मोठी दैना झाली.
काही ठिकाणी बदलत्या हवामानाचा अंदाज आल्याने हरभरा काढणीच्या कामांना ब्रेक लागलेला आहे. त्यात शुक्रवारी अवकाळी पावसाने झोडपुन काढल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले. अंबाजोगाई शहर आणि परिसरातील अवकाळी पावसाचे, शेतीच्या नुकसानीचे अनेक व्हिडीओ नेटकऱ्यांनी सोशल मिडियावरून व्हायरल केले. आता शेतकरी शासनाच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहे.