लोकसभा आणि विधानसभा एकत्र ? : मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याबाबत दबक्या आवाजात चर्चा आहे. यासाठी प्रशासन आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची सज्जता लागणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्र लागल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिली. ते भंडाऱ्यामध्ये बोलत होते. निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने देशपांडे राज्याच्या दौऱ्यावर आहेत.

प्रत्येक निवडणुकीसाठी पुरेसा कालावधी लागतो. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेणे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आढावा दौरा सुरू आहे. सर्व अडचणींवर मात करून तयारी करणे हा या दौऱ्यामागील मूळ उद्देश आहे. 2024 मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र झाल्यास निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज आहे, असं मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. प्रक्रिया सुरू असताना धक्कादायक माहिती समोर आली असून, मतदार यादीतील तब्बल 32 लाखांपेक्षा अधिक मतदारांचे यादीतील फोटो सारखेच आहेत. त्यामुळं यात बनावट कुठले हे पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू असून बनावट मतदारांना यादीतून वगळण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले. निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया सुरु असून, यामध्ये महाविद्यालयीन तरुणांना समाविष्ट करण्यावर भर देण्यात येत आहे. 18 वयापेक्षा जास्त वयोगटातील 40 टक्केपर्यंत मृत मतदारांची नावे यादीत असून ती नावे वगळली जाणार असल्याची माहितीही यावेळी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.