पुणे : ‘देवयानी’ फेम अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून याप्रकरणी नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
मधू मार्कडे अस मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मधू मार्कडे आणि भाग्यश्री मोटे या बहिणी आहेत. मधू ही वाकड परिसरात केक बनवण्याचा व्यवसाय करते, सोबत तिची मैत्रीण देखील असते.
रविवारी मधू तिच्या मैत्रिणीसह भाड्याची खोली बघण्यासाठी गेली होती. रूम बघून झाल्यानंतर अचानक मधूला चक्कर येऊन दातखिळी बसली. तिला तातडीने सोबत असलेल्या मैत्रिणीने खासगी रुग्णालयात नेले. तिथे उपचार होऊ न शकल्याने महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यात आले, तिथं तपासल्यानंतर मधूला मृत घोषित करण्यात आलं.
दरम्यान, मधूचा मृत्यू हा संशयास्पद असून तिचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वाकड पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस करत आहेत.