नवजीवन व्यसनमुक्तीचे 4 केंद्र सील : पोलीस आणि आरोग्य प्रशासनाची कारवाई

बीड : नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीरपणे रुग्णांची छळवणूक, महिलांचे लैंगिक शोषण, बेकायदा औषध उपचार करणाऱ्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा भांडाफोड जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी पोलिसांच्या मदतीने केला. नवजीवनचे केज, मोरेवाडी, वाघाळा आणि बीड येथील केंद्र सील करून पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने येथील रुग्णांची सुटका केली आहे. डाॅ. साबळे यांच्या या धडाकेबाज कारवार्ईची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरु आहे. 

अंबाजोगार्ई तालुक्‍यातील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करुन त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अंजली पाटील, डाॅ. राजकुमार गवळे आणि ओम डोलारे यांच्याविरुद्ध अंबाजोगार्ई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 

नवजीवन व्यसनमुक्तीचे 4 केंद्र सील केल्यानंतर बीड येथील केंद्रातून 28 रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवले तर केज, मोरेवाडी आणि वाघाळा येथील तब्बल 100 पेक्षा अधिक रुग्णांना त्या – त्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर कारभार सुरु होता. 

खोटी कागदपत्रे, एक्सपायरी औषधांचा साठा जप्त 

या सर्व केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी झालेली औषधें, बेकायदेशीर स्टाफ, खोटी कागदपत्रे, गोळ्या – औषधे आढळून आली. हे चारही केंद्र सील करण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली राजरोसपणे बेकायदेशीर कामे केली जात होती, मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी औषधे या ठिकाणी वापरली जात होती, ही सर्व केंद्र सील करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी दिली आहे. 

बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, कविता नेरकर, पंकज कुमावत यांच्या पथकाने जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुरेश साबळे यांना सोबत घेत वाघाळा, मोरेवाडी, केज आणि बीड शहरातील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रावर छापे घातले.