पुणे : बारावीची परीक्षा सुरु झाल्यानंतर पहिल्याच पेपरमध्ये मोठा घोळ असल्याचा उघडकीस आला. बारावीच्या इंग्रजीच्या पेपरमध्ये सहा गुणांसाठी प्रश्नाऐवजी उत्तर छापण्यात आले. ज्यामुळे पेपर सोडवतानाच विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. ज्यामुळे काहींनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर काहींनी हा प्रश्न सोडवलाच नाही. त्यामुळे आता याविषयीचा मोठा निर्णय राज्य शिक्षण मंडळाकडून घेण्यात आला आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून इंग्रजीच्या पेपरमध्ये झालेल्या चुकांच्या पार्श्वभूमीवर विषयतज्ज्ञ व सर्व विभागीय मंडळाच्या प्रमुख नियामकांच्या उपस्थितीत इंग्रजी विषयाची संयुक्त सभा घेण्यात आली. शुक्रवारी ही सभा घेण्यात आली होती. या सभेमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांना सहा गुण देण्यात येणार आहेत. तर राज्य शिक्षण मंडळाकडून झालेल्या चुकीमुळे कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय करण्यात येणार नाही, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, शिक्षण मंडळाकडून झालेल्या या चुकीमुळे सर्वच विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी सरसकट 6 गुण देण्यात यावे, अशी मागणी शिक्षक आणि पालकांकडून करण्यात आली होती. यानुसार, ज्या विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांना गुण देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेला आहे.
इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत प्रश्न क्रमांक A3, A4, आणि A5 या क्रंमाकांचे प्रश्न न विचारता थेट उत्तरं देण्यात आली होती. त्यामुळे या प्रश्नामुळे गोंधळलेल्या काही विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तर काहींकडून हा प्रश्न सोडून देण्यात आला.
दरम्यान, यंदाच्या बारावीच्या परीक्षांमध्ये कोणताही गोंधळ होऊ नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले आहेत. पण तरी देखील हिंदी, इंग्रजी या प्रश्न पत्रिकांमध्ये शिक्षण मंडळाकडून होणारी चूक, त्यानंतर लगेच गणिताचा पेपर फुटण्याची घटना यामुळे एकच तारांबळ उडाली आहे. तर मराठी विषयाच्या पेपरमध्ये वाढलेले कॉपीचे प्रमाण यामुळे शिक्षण मंडळावर ताशेरे ओढण्यात येत आहे.