मुंबई : बॉलिवूडची ‘मर्दानी’ अर्थात अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 17 मार्चला रिलीज होणाऱ्या या चित्रपटाच्या प्रोमोने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेला प्रतिसाद पाहून अभिनेत्री राणी मुखर्जी देखील भारावून गेली आहे. लोकांचं प्रेम पाहून राणीला देखील आनंद झाला असून, तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रेक्षकांचं इतकं प्रेम पाहून ‘ब्लॅक’ चित्रपटाची आठवण आल्याचं राणी म्हणाली.
राणी मुखर्जी म्हणाली की, ‘ज्या प्रकारे लोक ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या ट्रेलरला भरपूर प्रतिक्रिया देऊन आपली पसंती दर्शवतायत, ते बघून मला ‘ब्लॅक’ चित्रपटाची आठवण आली. जगभरातील प्रेक्षकांचं माझ्यावर असलेलं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. माझ्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीत हे पहिल्यांदाच घडत आहे की, लोक माझ्या चित्रपटाच्या ट्रेलरला इतकं भरभरून प्रेम देत आहेत.’
राणी पुढे म्हणाली की, ‘प्रेक्षकांना जसा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ चा ट्रेलर आवडला आहे, तसाच हा संपूर्ण चित्रपट देखील आवडणार आहे. ट्रेलर पाहून लोक ज्या प्रकारे आपल्या प्रतिक्रिया देत आहेत, ते पाहून मला आनंद होत आहे. जेव्हा माझा ‘ब्लॅक’ हा चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा मला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं होतं. या आधी कधीच इतका उदंड प्रतिसाद मिळाला नव्हता.’
अभिनेत्री राणी मुखर्जी हिच्या ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला असून, या ट्रेलरवर प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटाच्या ट्रेलरने आतापर्यंत 30 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळवले आहेत. इतकेच नाही तर, या चित्रपटाचा ट्रेलर सध्या युट्युबवर देखील ट्रेंड करत आहे. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात राणी मुखर्जी ‘मिसेस चॅटर्जी’ हे मुख्य पात्र साकारत आहे.