बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली गावाला ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान’ प्रदान

नवी दिल्ली : बीड जिल्ह्यातील नांदूर हवेली या ग्रामपंचायतीला नळाद्वारे नियमित स्वच्छ पाणीपुरवठा आणि त्याचे देखभाल व व्यवस्थापनाच्या उल्लेखनीय कार्यासाठी ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ ने केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुस्कार नांदूर हवेलीच्या सरपंच शेख मन्नाबी मुज़फ्फर पटेल यांनी स्वीकारला.

येथील विज्ञान भवनात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने आज ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ सोहळयाचे आयोजन करण्यात आले. यासह ‘जलशक्ति अभियान : कैच द रेन 2023’ या कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रपती, केंद्रीय जलशक्ति मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ति राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, विश्वेश्वर टुडू, केंद्रीय संचार राज्यमंत्री देवुसिंह चौहान, पेयजल आणि स्वच्छता विभागाच्या सचिव विनी महाजन, जल संसाधन, नदीविकास सचिव पंकज कुमार व्यासपीठवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने देशभरातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीमध्ये असणाऱ्या महिलांचा ‘स्वच्छ सुजल शक्ति सन्मान 2023’ पुरस्काराने गौरव करण्यात आला. यातील 18 महिलांचा सन्मान राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र प्रदान करून करण्यात आला. तर, 18 महिलांचा सन्मान केंद्रीय जलशक्ति  मंत्री  शेखावत यांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये बीड जिल्ह्यातील नांदूर हवेलीच्या सरपंच शेख मन्नाबी पटेल यांनाही सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमात केंद्रीय संचार मंत्रालयाच्या वतीने ‘माय स्टॉप’ या विशेष डाक तिकीटीचे लोकार्पण राष्ट्रपती यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने जलशक्ति मंत्रालयाच्या प्रेरणेने करण्यात आले.