मुुंबई : राज्यातील सर्व महाविद्यालयांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन तसेच मानांकन करणे बंधनकारक असणार आहे. याबाबत सूचना राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने दिल्या असून, तसे न केल्यास संबंधित महाविद्यालयांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यातील तब्बल 60 टक्के महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन नसल्याचं समोर आल आहे. त्यामुळे हा आदेश देण्यात आला आहे. राज्यातील नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन नसलेल्या महाविद्यालयांना उच्चतंत्र शिक्षण विभागाने 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीच्या आत नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन आणि मानांकन न केल्यास संबंधित महाविद्यालयांना येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार नाही अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं राज्यातील सर्व महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे, त्या दृष्टिकोनातून या सर्व प्रक्रिया सर्व महाविद्यालयांनी पार पाडणे आवश्यक असल्याचे या आदेशात सांगितले आहे.
राज्यातील विनाअनुदानित 2141 महाविद्यालयां पैकी केवळ 138 महाविद्यालयांचे मूल्यांकन पुनर्मूल्यांकन पूर्ण झाल्याचे समोर आल्याने उच्चतंत्र शिक्षण विभागाने या विषयी गंभीर होऊन निर्देश दिले आहेत.