बुलढाण्यात पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक

मुंबई : बुलढाण्यात पेपरफुटी प्रकरणात दोन शिक्षकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेदरम्यान या शिक्षकांनी व्हॉट्सॲप ग्रुप बनवून कॉपी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 

परीक्षेत पास करून देण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी 10 ते 12 हजार रुपये घेतले जात असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. या सर्वांविरोधात कलम 420 आणि 120 ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पेपरफुटी प्रकरणातला मुख्य सूत्रधार अद्यापही पोलिसांना सापडला नसून त्याचा तपास सुरू आहे.

दरम्यान, बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरणाचा संबंध मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये सकाळी 10 वाजून 17 मिनिटांनी गणिताचा पेपर सापडला. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.