बीड : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात माजलगावची सोनाली अर्जुन मात्रे महिलांमध्ये राज्यात प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिने तिसरा क्रमांक पटकावला आहे. या मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 405 पदांसाठी 7 ते 9 मे 2022 या कालावधीत मुख्य परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारीला जाहीर झाला. प्रमोद चौगुले यांनी 633 गुण घेऊन राज्यात पहिला येण्याचा मान पटकावला तर शुभम पाटील 616 गुण घेऊन दुसरा आला.
माजलगाव येथील सोनाली मात्रे या लेकीने महिलांमधून राज्यात प्रथम तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तिसरा येण्याचा मान पटकावला आहे. सोनाली माजलगाव तालुक्यातील ईरला मजरा या छोट्याशा गावातील असून शेतकरी अर्जुन मात्रे यांची कन्या आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार यासह एकूण 20 पदांच्या 405 जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.