अंधत्वावर मात करुन यशस्वी संगीतकार ठरले होते रवींद्र जैन, संगीत दिलेल्या गाण्यांची गोडी होती सुरेख 

टीम AM : जेष्ठ गीतकार व संगीतकार रवींद्र जैन यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1944 ला झाला. भावमधूर संगीताची कास कायम धरत भाषा कुठलीही असो, सहजी लोकांच्या हृदयाला भिडेल अशा संगीतातून त्या भावना पोहोचवणे ही संगीतकार रवींद्र जैन यांची खासियत होती. 

‘गीत गाता चल, हो साथी गुनगुनाता चल’ हे सहज ओठांवर रूळणारे गाणे असेल किंवा ‘अखियों के झरोकोंसे..’ हे हळूवार संवाद साधणारे गाणेही सहजी गुणगुणता येईल अशा पद्धतीने रचणाऱ्या रवींद्र जैन यांची लोकप्रियता रामायण व श्रीकृष्ण या दुरदर्शन मालिकांचे संगीताने वाढली होती.

‘हिना’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘पहेली’, ‘चोर मचाए शोर’, ‘गीत गाता चल’ या चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत विशेष गाजले. त्यांनी संगीत दिलेल्या गाण्यांमध्ये सचिन आणि रंजीतावर चित्रित झालेले ‘अखियों के झरोकोंसे..’ हे गाणे खूप लोकप्रिय ठरले. विरोधाभास एवढाच की दोन्ही डोळ्यांनी अंध असणाऱ्या या संगीतकाराने आपल्या संगीतामधून कधीच आपली वेदना जाणवू दिली नाही. 

सत्तरच्या दशकातील हिंदी चित्रपटांमधून रविंद्र जैन यांनी अनेक हळूवार भावगीतांमधून सुरांची पखरण केली. प्रत्येक संगीतकाराचा आपला एक आवडता गायक किंवा गायिका असते. जैन यांच्या संगीताचे नाते जोडले गेले ते गायक येसूदास यांच्याशी. किंबहूना दक्षिणेकडच्या या गायकाला हिंदी चित्रपटांमध्ये आणणाऱ्या जैन यांचे त्यांच्याशी इतके घट्ट नाते होते की जर आपल्याला दृष्टी मिळालीच तर पहिले येसूदास यांचा चेहरा पहायला आवडेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती. 

‘पद्मश्री’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. बदलत्या काळानुसार त्यांनी आपल्या संगीतात बदल केला तरी त्यांनी संगीत दिलेल्या गाण्याची गोडी सुरेख होती. संगीतकार जैन यांनी फक्त चित्रपटांमधील गीतांना नव्हे तर प्रायव्हेट अल्बम, गझल, पौराणिक मालिकांनाही त्यांनी दिलेल्या संगीताला वेगळे महत्त्व होते. रवींद्र जैन यांचे 9 ऑक्टोबर 2015 रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे रवींद्र जैन यांना आदरांजली. 

शब्दांकन : संजीव वेलणकर