मुंबई : शेतकऱ्यांसाठीची प्रलंबित आर्थिक मदत येत्या 31 मार्च पर्यंत देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलत होते. बीड जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईचा मुद्दा प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता.
त्यावर मुख्यमंत्र्यांनी राज्यभरात सहा हजार आठशे कोटी रुपये नियमित नुकसानापैकी सहा हजार कोटी रुपये तर सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानापोटी 755 कोटी रुपये वाटप झाल्याचं सांगितलं. तीन हजार 300 कोटी रुपये अतिरिक्त नुकसान भरपाईची मागणी आली असून, त्याची वैधता तपासली जात असल्याचं सांगितलं. कर्जाची मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही अनुदान वाटप केलं जात असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी याबाबत बोलताना, अजून फार मोठा वर्ग या अनुदानापासून वंचित असल्याचं सांगितलं. हे अनुदान देण्यासाठी कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ही मदत 31 मार्चपर्यंत दिली जाईल, असं सांगितलं.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक आक्रमक
दरम्यान, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी आज सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. सरकारने या प्रश्नावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नाना पटोले यांनी केली. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार कांदा उत्पादकांच्या पाठिशी असून, नाफेडद्वारे कांदा खरेदी सुरू झाल्याची माहिती दिली.
सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
आजचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.