अभिनेत्री दिव्या भारती : 3 वर्षांच्या करिअरमध्ये 20 सिनेमे, 19 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, जाणून घेऊयात अनसुने किस्से

टीम AM : ‘ऐसी दिवानगी’, ‘सात समंदर’ ही गाणी ऐकली की एक चेहरा डोळ्यांसमोर येऊन उभा राहतो तो म्हणजे अभिनेत्री दिव्या भारती. बॉलिवूडची अशी अभिनेत्री जिने फार कमी वयात ग्लॅमरस दुनियेत सक्सेस मिळवलं आणि फार लवकर या जगाचा निरोप घेतला. दिव्याचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी झाला. दिव्या भारतीनं वयाच्या 19 वर्षी या जगाचा निरोप घेतला. घराच्या बाल्कनीतून पडल्यानं दिव्याचा मृत्यू झाला.

दिव्या भारती हे चित्रपटसृष्टीला पडलेलं एक स्वप्न होतं असं म्हटलं तर अतिशोयक्ती वाटू नये. कारण वयाच्या अवघ्या 19 वर्षीच तिनं सर्वांची मनं जिंकली होती. ‘विश्वात्मा’ हा हिंदीतला तिचा पहिला चित्रपट होता. राजीव राय यांनी तिला या चित्रपटातून हिंदीत ब्रेक दिला. यातलं ‘सात समंदर पार मै तेरे’ या दिव्यावर चित्रित केलेल्या गाण्यानं तर धमालच केली होती. त्यानंतर ‘शोला और शबनम’ नं तिच्या विजयात आणखी भर घातली. दिव्या आणि गोविंदा जोडी हिट झाली होती. तर शाहरुख खान – ऋषी कपूरबरोबरच ‘दिवाना’ नं तर तीनं सर्व अभिनेत्रींना मागं टाकलं. 

शाहरुख खान बरोबरच्या या चित्रपटानं तिला यश तर दिलच पण त्यावेळी ती सर्वात मोठी स्टारही झाली होती. ‘दिवाना’ नंतर दिव्याचं मानधन 25 लाखांवर गेलं होतं, असं सांगितलं जातं. म्हणजे त्यावेळी टॉपवर असलेल्या श्रीदेवी, माधुरी यांच्यापेक्षा जास्त मानधन ती घेऊ लागली. त्यातच दिवानाची गाणी आणि चित्रपटानं सगळ्यांच्या हृदयाचा गेमच केला होता. कॉलेजमधली तरुणाई तर ‘ऐसी दिवानगी देखी नही कही..’ या शाहरुख आणि दिव्याच्या गाण्यावर फिदा झाली होती. शाहरुख आणि दिव्या हीच चर्चा त्यावेळी होत होती.

‘दिवाना’ रिलीज झाला ते वर्ष होतं 1992. त्यावर्षी सगळीकडं दिव्याचा बोलबाला होता. दिव्यानं हिंदीत जवळपास 13 – 14 चित्रपट केले. त्यातले काही सुपर डुपर हिट झाले तर काही जेमतेम चालले. पण तीनं त्यावेळच्या सर्व प्रस्थापित अभिनेत्रींनी धक्का दिला होता. हिंदी चित्रपटसृष्टीत येण्याअगोदर दिव्यानं तेलुगू चित्रपटातून आपलं करिअर सुरु केलं होतं. प्रसिद्ध निर्माता डी. रामानायडू यांनी मुलगा याच्या बरोबरच्या ‘बोब्बीली राजा’ या चित्रपटातून हिरोईन म्हणून दिव्याला पुढं आणलं. दिव्याचा अभिनेत्री म्हणून पहिलाच सिनेमा हिट झाला आणि बघता बघता तिनं तेलुगू चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केलं. त्यावेळी तेलुगूतली यशस्वी अभिनेत्री विजयाशांती हिच्या नंबर एकच्या स्थानाला तिनं आव्हान दिलं होतं. त्यानंतर तिचा प्रवास हिंदीत झाला. 

पण ‘बोब्बीली राजा’ च्या अगोदर दिव्यालाही मोठ्या दिव्यातून जावं लागलंय. तिचा चित्रपटसृष्टीतला प्रवेशच खूप त्रासदायक झालाय. वयाच्या अवघ्या 14 वर्षी तीला चित्रपटासाठी विचारण्यात येत होतं. त्यावेळची सुपरस्टार श्रीदेवी हिच्या चेहऱ्याशी थोडीफार मिळती जुळती असल्यामुळे तिला मागणी होत होती. नंदू तोराणीनं तिला ‘गुनाहों का देवता’ साठी विचारलं होतं. त्यानंतर गोविंदाचा भाऊ किर्तीकुमार यानं दिव्याला घेऊन ‘राधा का संगम’ करण्याचं ठरवलं, पण काही दिवसाच्या शुटींगनंतर दिव्याला तो सिनेमा सोडावा लागला. 

सुभाष घई यांनी दिव्याला सौदागरमध्ये अमिर खानबरोबर घेतलं होतं. पण तिथंही माशी शिंकली आणि सुरवातीचं काही शुट झाल्यानंतर दिव्याला काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिला शेखर कपूर, शबनम कपूर यांनीही विचारणा केली होती, पण तिचा कोणताच चित्रपट सुरु होत नव्हता. मुंबईत आपली डाळ शिजत नाही, असं समजल्यानंतर तीनं हैदराबाद गाठलं. तोपर्यंत तिला शाळा अर्धवटच सोडावी लागली होती. त्यामुळे पुन्हा शाळेत जाणं शक्य नव्हतं. त्याचवेळी तिला डी. रामानायडूंचा ‘बोब्बीली राजा’ मिळाला आणि तिचं नशिब बदललं.

‘बोब्बीली राजा’ नंतर तिला ‘विश्वात्मा’ मिळाला आणि त्यानंतर दिव्या भारती हिंदीत पुन्हा झोकात आणि धडाकेबाज यश मिळवत आली. साजीद नाडीयादवालाशी तीनं लग्न केलं होतं. पण त्यातही काही वाद होते, असं म्हणतात. त्यावेळच्या लाखो हृृदयांंची धडकन होती दिव्या भारती. अभिनेत्री म्हणून हिट ठरलेली दिव्या तिचा जिवनाचा प्रवास सुरु करण्याअगोदरच सर्वांना सोडून गेली. दिव्या भारतीचे 5 एप्रिल 1993 रोजी निधन झाले.

शब्दांकन : संजीव वेलणकर