राज्य लोकसेवा आयोगाकडून पाच विभागांसाठी 678 जागांसाठी भरती, ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत (नवा पॅटर्न) लागू करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सन 2025 पासून करण्यात येणार असल्याची घोषणा आयोगाने ट्विट करून केली. या निर्णयानंतर एमपीएससीकडून आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या पाच विभागाची भरती प्रक्रिया एमपीएससीकडून लवकरच राबविण्यात येत आहे. या संदर्भात राज्य लोकसेवा आयोगाने नोटिस काढली असून ट्विटरवर देखील माहिती दिली आहे.

5 विभागातील 673 पदांची भरती

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षा असून याद्वारे तब्बल 5 विभागातील 673 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीची पूर्व परीक्षा 4 जून रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रांवर होणार आहे. 

या विभागासाठी ही भरती प्रक्रिया

सामान्य प्रशासन विभाग, पाणी पुरवठा आणि स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्ये या विभागासाठी ही भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. या परीक्षेसाठी 22 मार्च पर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे

पूर्व परीक्षेतील निकालात मेरिटच्या आधारे पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाणार आहे. ही परीक्षा 7 ते 9 ऑक्टोबर, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट अ आणि गट ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, विद्युत अभियांत्रिकी सेवा गट ब मुख्य परीक्षा 14 ऑक्टोबर, निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब मुख्य परीक्षा 21 ऑक्टोबर, अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा गट ब मुख्य परीक्षा 28 ऑक्टोबरला होणार असल्याचे आयोगाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

सामान्य प्रशासन विभागामध्ये 295 पदे, पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात 130 पदे, सार्वजनिक बांधकाम विभागात 15 पदे, अन्न व नागरी विभागात 39 पदे, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागात 194 पदांकरिता ही परीक्षा घेतली जाणार आहे.