टीम AM : बॉलिवूडची ‘हवाहवाई’ अर्थात अभिनेत्री श्रीदेवी हिचा आज जन्मदिन आहे. आज भलेही श्रीदेवी आपल्यात नसेल, पण चाहत्यांच्या हृदयात ती आजही जिवंत आहेत. श्रीदेवीने केवळ आपल्या अभिनयानेच नव्हे, तर सौंदर्यानेही लोकांना घायाळ केले होते. आजही तिचे चित्रपट प्रेक्षक आवडीने आवर्जून बघतात.
श्रीदेवीला बॉलिवूडची पहिली ‘लेडी सुपरस्टार’ म्हटलं जातं. 24 फेब्रुवारी 2018 या दिवशी श्रीदेवीच्या आकस्मिक निधनाने अवघ्या मनोरंजन विश्वालाच मोठा धक्का बसला होता.
श्रीदेवींचा जन्म 13 ऑगस्ट 1963 रोजी झाला. श्रीदेवी यांचे पूर्ण नाव श्रीदेवी कपूर होते, श्रीदेवीने बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. वयाच्या चौथ्या वर्षी तिने पहिल्यांदा चित्रपटात काम केले होते. ‘कंदन करुनई’ या तामिळ सिनेमात श्रीदेवी अभिनेत्री म्हणून झळकली होती.
बालकलाकार म्हणून तिने दक्षिणेतील अनेक चित्रपटातून काम केले. ‘सोलवां सावन’ या चित्रपटात ती अभिनेत्री म्हणून झळकली. मात्र ‘हिम्मतवाला’ मुळे तिला ओळख मिळाली. या चित्रपटानंतर तिची बॉलिवूडच्या सुपरस्टार अभिनेत्रीत गणना होऊ लागली. श्रीदेवीने आपल्या करियरमध्ये अनेक दमदार भूमिका केल्या.
‘चालबाज’ चित्रपटात तिने दुहेरी भूमिका केली तर ‘सदमा’ या चित्रपटातील तिचा अभिनय अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्याकाळातील लोकप्रिय अभिनेता मिथून चक्रवर्ती याच्या प्रेमात श्रीदेवी पडली.
मिथूनचे अगोदर लग्न झाले होते. त्याकाळात दोघांचेही करियर जोरात होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची फिल्मी वर्तुळात खूप चर्चा झाली, पण हे नाते टिकू शकले नाही. त्यानंतर 1996 साली श्रीदेवीने बोनी कपूरसोबत विवाह केला. अनेक पौराणिक सिनेमांमध्ये श्रीदेवीने काम केले आहे. तिने तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांतही कामे केली.
श्रीदेवीने आजपर्यंत ‘कलाकार’, ‘सदमा’, ‘अक्लमंद’, ‘इन्कलाब’, ‘जाग उठा इंसान’, ‘सरफरोश’, ‘आखिरी रास्ता’, ‘भगवान दादा’, ‘धर्म अधिकारी’, ‘घर संसार’, ‘नगीना’, ‘कर्मा’, ‘सुहागन’, ‘सल्तनत’, ‘औलाद’, ‘हिम्मत और मेहनत’, ‘मिस्टर इंडिया’, ‘चांदनी’, ‘गुरु’, ‘निगाहें’, ‘बंजारन’, ‘फरिश्ते’, ‘पत्थर के इंसान’, ‘लम्हे’, ‘खुदा गवाह’, ‘हीर रांझा’, ‘चंद्रमुखी’, ‘गुमराह’, ‘रूप की रानी चोरों का राजा’, ‘चांद का टुकड़ा’, ‘लाडला’, ‘आर्मी’, ‘मि. बेचारा’, ‘कौन सच्चा कौन झूठा’, ‘जुदाई’, ‘मिस्टर इंडिया 2’ यासारख्या चित्रपटातून भूमिका केल्या होत्या.
हिंदी चित्रपटांत पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून श्रीदेवीला समजले जाते. लग्नानंतर श्रीदेवी बॉलिवूडपासून दूर गेली होती. श्रीदेवीने खूप वर्षांनंतर ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पुर्नपदार्पण केले. ‘इंग्लिश विंग्लिश’ मधून बॉलिवूडमध्ये पुनरागमन केल्यानंतर अभिनेत्री श्रीदेवीने ‘मॉम’ या चित्रपटात अभिनय केला होता. श्रीदेवीचे 24 फेब्रुवारी 2018 ला निधन झाले.
शब्दांकन : संजीव वेलणकर