श्रावणबाळ – संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान रखडले : लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील श्रावणबाळ – संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांचे अनुदान रखडल्याने लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या योजनांचे अनुदान तात्काळ देण्यात यावेत, अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. 

अंबाजोगाई तालुक्यात संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृती वेतन योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान गेल्या तीन – चार महिन्यांपासून मिळाले नाही, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील खेड्यापाड्यातून दररोज लाभार्थी तहसील कार्यालयात आणि बॅंकेत चकरा मारत आहेत आणि अनुदानाची रक्कम कधी मिळणार, याची विचारपूस करित आहेत. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने गावी परतावे लागत आहे. 

लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे : तहसीलदार

श्रावणबाळ – संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या अनुदानासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु असून अनुदान उपलब्ध झाल्यास त्वरित लाभार्थ्यांना देण्यात येईल. लाभार्थ्यांनी अनुदान घेण्यासाठी तहसील कार्यालयात किंवा गावातील तलाठ्याकडे हयात प्रमाणपत्र सादर करावे, असे आवाहन तहसीलदार डॉ. विपीन पाटील यांनी केले आहे.