मुंबई : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग – एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी बोलताना केली.
विद्यार्थ्यांनी या संदर्भात केलेल्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याचं त्यांनी सांगितलं. आपण तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आयोगाशी चर्चा करुन हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांच्या हिताच्या या निर्णयाचं आपण स्वागत करतो, असं मुख्यमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या या संदर्भातल्या आंदोलनाला काही जणांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानंही आज सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या संदर्भातली माहिती दिली आहे.