नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सलग तिसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी आज ठाकरे गटाची बाजू पुढे मांडताना अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले.
एकनाथ शिंदे यांची बंडखोरी, त्यांचा बहुमताचा दावा, त्यांचा शपथविधी या घटनाक्रमाचा उल्लेख करून त्यावर भूमिका मांडली. सिब्बल यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राज्यपाल बहुमताचा निर्णय घेऊ शकतात का, असा प्रश्न विचारला.
सिंघवी यांनी बहुमत चाचणी आणि आमदारांची अपात्रता या मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यावेळी बहुमत चाचणीला उद्धव ठाकरे सामोरे गेले असते, तर परिस्थिती वेगळी असू शकली असती अशा आशयाचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं. या प्रकरणाची पुढची सुनावणी आता येत्या मंगळवारी 28 तारखेला होणार आहे.