महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरची सुनावणी अखेरच्या टप्प्यात : गुरुवारपर्यंत दोन्ही गटांचा सलग युक्तिवाद

नवी दिल्ली : राज्यातल्या सत्तासंघर्षावर गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेली सुनावणी आता अखेरच्या टप्प्यात पोचली आहे. 

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठापुढे आजपासून सुरू झालेल्या तीन दिवसांच्या सलग सुनावणीत आज ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी दहा मुद्दे उपस्थित केले. 

पक्षचिन्हावर निवडून आलेले आमदार वेगळा निर्णय घेऊ शकतात का, एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाकडून अपात्रतेची कारवाई सुरू अस्ताना राज्यपालांनी शिंदे यांना सत्तास्थापनेसाठी बोलावणं नियमबाह्य नाही का, एखाद्या आमदाराला अपात्र ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयात न्यायालय हस्तक्षेप करू शकते का, पक्षांतर्गत वादाची समीक्षा न्यायालयाकडून केली जाऊ शकते का, आदी मुद्यांचा यामध्ये समावेश होता.

आजचं कामकाज संपलं असून, उद्याही ठाकरे गटाचा युक्तिवाद सुरू राहणार आहे. त्यानंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद सुरू करतील, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.