अंबाजोगाईतील शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर : कार्यालयीन कामे खोळंबली 

अंबाजोगाई : शहरातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी विविध मागण्यांसाठी दिनांक 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर आहेत. दरम्यान कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाविद्यालयातील प्रशासकीय कामे खोळंबली आहेत. 

राज्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली नसल्याने 20 फेब्रुवारीपासून  शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. 

1410 विद्यापीठीय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. 1 जानेवारी 2016 पासून प्रत्यक्ष सातवा वेतन आयोग लागू झाला. याची फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना तात्काळ अदा करावी, यासह विविध मागण्यांसाठी हा बेमुदत संप सुरू केला आहे. या संपात अंबाजोगाईतील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.