‘रौंदळ’ चा धमाकेदार ट्रेलर रिलीज : भाऊसाहेब शिंदेंचा ‘अँग्री यंग मॅन लूक’, 3 मार्चला प्रदर्शित

मुंबई : ‘रौंदळ’ या आगामी चित्रपटाच्या टिझरनं रसिकांच्या मनात उत्सुकता जागवण्याचं काम केल्यानंतर या चित्रपटाचा बहुप्रतिक्षीत ट्रेलर आणि संगीत प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला आहे.

महालक्ष्मी येथील फेमस स्टुडिओमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात कुमार मंगत पाठक आणि बाळासाहेब शिंदे यांच्या हस्ते ‘रौंदळ’ चा ट्रेलर लॉन्च आणि संगीत प्रकाशन करण्यात आले. 

याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञमंडळी उपस्थित होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ सोबतच संगीतप्रधान ‘बबन’ या रोमँटिक चित्रपटात दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेचा अँग्री यंग मॅन लुक ‘रौंदळ’ च्या ट्रेलरचं मुख्य आकर्षण ठरत आहे. 3 मार्च 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

‘रौंदळ’ ची निर्मिती भूमिका फिल्म्स ॲन्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांनी केली आहे. रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या संगीतप्रधान रोमॅंटिक चित्रपटाचं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमधील भाऊसाहेब शिंदेचं रूप नजर खिळवून ठेवणारं आहे. नवोदित अभिनेत्री नेहा सोनावणे सोबतची भाऊसाहेबची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणार आहे.