ज्येष्ठ गायक – संगीतकार बप्पी लहरी यांचा स्मृतिदिन : वयाच्या चौथ्या वर्षीच लता मंगेशकर यांच्या गाण्यासाठी वाजवला होता तबला

ज्येष्ठ गायक – संगीतकार बप्पी लहरी यांचा स्मृतिदिन. त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1953 कोलकता येथे झाला. बप्पी लहरी हे मनोरंजन विश्व आणि चाहत्यांमध्ये ‘बप्पी दा’ या नावाने लोकप्रिय होते. बप्पी लहरी हे भारताला डिस्को संगीताची ओळख करुन देणाऱ्या गायकांपैकी एक मानले जातात. बप्पी लहरी यांनी 70 – 80 दशकाच्या उत्तरार्धात चलते चलते, डिस्को डान्सर आणि शराबी सारख्या अनेक चित्रपटांमध्ये लोकप्रिय गाणी दिली.

बप्पी लहरी यांचे खरे नाव अलोकेश लहरी होते. बप्पी लहिरी हे चित्रपटसृष्टीत आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले जात. सदैव अंगावर सोन्याचे दागिने असलेला संगीतकार म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट गाणी गायली व अनेक रिॲलिटी शोचे परीक्षक म्हणूनही काम केले आहे. पॉप संगीत भारतात आणण्याचे श्रेयही बप्पीदा यांना जाते. 

बप्पी लहरी यांना जन्मापासूनच संगीताचे शिक्षण मिळाले. बप्पी लहिरी यांचे वडील अपरेश लहरी हे बंगाली गायक होते. त्यांची आई बन्सरी लहरी या संगीतकार होत्या. त्यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तीन वर्षांचे असताना ते तबला वाजवायला शिकले. वयाच्या चौथ्या वर्षीच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या गाण्यासाठी तबला वाजवला होता. यामुळे त्यांना ‘मास्टर बप्पी’ ही ओळख मिळाली व तेच त्यांचे व्यावसायिक नांव बनले. 

वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत आल्यानंतर बप्पी लहरी यांना पहिला ब्रेक 1972 मध्ये आलेल्या बंगाली चित्रपट ‘दादू’ मध्ये मिळाला. नंतर त्यांनी 1973 मध्ये आलेल्या ‘शिकारी’ चित्रपटासाठी संगीत दिले. बप्पी लहरी यांनी 70 च्या दशकात चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आणि 80 च्या दशकात त्यांनी वर्चस्व गाजवले. प्रत्येक चित्रपटात गाण्यासाठी ते निर्मात्यांची पहिली पसंती असायचे. 1975 मध्ये आलेल्या ‘जख्मी’ चित्रपटातून बप्पीला ओळख मिळाली. 

1980 आणि 90 च्या दशकात बप्पी लहरी यांनी अनेक जबरदस्त साउंड ट्रॅक बनवले, ज्यामध्ये वारदत, डिस्को डान्सर, नमक हलाल, डान्स डान्स, कमांडो, गँग लीडर, शराबी यांसारख्या चित्रपटांचा समावेश होता. बप्पी दा यांनी गायलेली ‘बंबई से आया मेरा दोस्त, आई एम ए डिस्को डांसर, जूबी – जूबी, याद आ रहा है तेरा प्यार, यार बिना चैन कहां रे, तम्मा तम्मा लोगे ही गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत. बप्पी लहरींनी डिस्को नृत्यांसाठी दिलेल्या चालींमुळे ते डिस्को किंग म्हणूनही ओळखले जातात.

2011 मध्ये त्यांनी विद्या बालन अभिनित ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटात ‘ऊ लाला ऊ लाला’ हे गाणे गायले, जे सुपरहिट ठरले. या गाण्याने  बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा सनसनाटी निर्माण केली. बप्पी दा यांच्या संगीत शैलीचे देशानेच नव्हे तर जगाने कौतुक केले. एका दिवसात सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करण्याचे श्रेयही बप्पी दा यांना जाते. बप्पी लहिरींनी जितकी डिस्को गाणी बनवली, त्यापेक्षा अधिक भजने ध्वनिमुद्रित केलेली आहेत. त्यांची गणेश आराधनेची गीते खूप लोकप्रिय झाली होती. 

किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सन देखील बप्पी दा यांच्या संगीत शैलीने प्रभावित झाला होता. मायकल जॅक्सनने बप्पी दा यांना मुंबईत झालेल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. त्यांनी भारतीय चित्रपटात सिंथेसाईज डिस्को संगीताचा वापर लोकप्रिय केला आणि स्वतःच्याही काही रचना गायल्या. त्यांनी बंगाली चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले होते. वारदात, डिस्को डान्सर, नमक हलाल, शराबी, डान्स डान्स, कमांडो, साहेब, गँग लीडर, सैलाब यासारख्या सिनेमांतील त्यांची गाणी प्रचंड गाजली होती. 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बागी 3 चित्रपटात ‘भंकस’ नावाचे त्यांचे शेवटचे बॉलिवूड गाणे ऐकायला मिळाले होते. 45 वर्षांच्या आपल्या चित्रपट कारकिर्दीत, बप्पी यांनी 500 हून अधिक चित्रपटांसाठी गाणी रेकॉर्ड केली आहेत. 

संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कारही मिळाला आहे. राजकारणाच्या दुनियेतही हात आजमावण्यात बप्पी दा मागे राहिले नाहीत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. बप्पी दा यांनी 1977 मध्ये चित्रानीसोबत लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे कुटुंब नेहमीच लाइमलाईटपासून दूर राहते. बप्पी लहरी यांचे 16 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन. 

शब्दांकन : संजीव वेलणकर