शिक्षकांची 30 हजार पदं लवकरच भरली जाणार :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

सिंधुदुर्ग : शिक्षकांची 30 हजार आणि केंद्रप्रमुखांची 4 हजार 860 रिक्त पद लवकरच भरली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वेंगुर्ले इथं राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 17 व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनाचं उद्‌घाटन केलं, त्यावेळी शिंदे बोलत होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र प्रमुखांची रिक्त पदे आपण भरतोय, शिक्षकांची 30 हजार पदं आपण भरतोय आणि त्याचबरोबर ही पदं भरण्यासाठी देखील पद्धत आहे ती आपण सोपी सुटसुटीत करतोय. त्याचबरोबर शाळाबाह्य मुलांच्या ज्या काही समस्या आहेत, मध्यान्ह भोजन असेल, व्यक्तिगत लाभाच्या इतर योजना आहेत, या सगळ्या त्रुटी दूर करण्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरतील असे महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आपण विशेष प्राधान्य देणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

जुन्या सेवानिवृत्ती वेतनाचा विषय सरकारनं गांभीर्यानं घेतल्याचं शिंदे यांनी सांगितलं. शिक्षकांच्या न्याय मागण्यांचा सरकार सकारात्मक विचार करेल, असं शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी नमूद केलं. डॉक्टरच्या गाडीवर जसं ‘डिआर’ लिहीलं जातं तसं शिक्षकांच्या गाडीवर ‘टीआर’ लिहिलेलं दिसेल असंही ते म्हणाले.