अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील तीन मजली मेडिसीन विभाग इमारतीमधील दोनही लिफ्ट पाच दिवसा पासुन बंद असल्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यामुळे रूग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाची लिफ्ट स्वा.रा.ती. प्रशासनाने तात्काळ दुरूस्ती करावी व रूग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.
येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय व महाविद्लयास अनेक समस्याने ग्रासले आहे. मेडीसीन विभाग तीन मजली नवीन इमारतीमध्ये महिला – पुरुष व लहान मुलांचे वार्ड आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात असते. येथे रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून ये-जा करण्यासाठी दोन लिफ्ट बसवण्यात आल्या आहेत. मात्र या लिफ्टमध्ये बिघाड होवून अनेक वेळा या बंद रहात आहेत. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे स्वा.रा. ती. प्रशासनावर नागरिकांची नाराजी वाढत आहे. सदरिल बंद पडलेली लिफ्ट तात्काळ चालू करावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.
दरम्यान लिफ्टची देखबाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विदयुत विभागाकडे आहे तर लिफ्टचे काम रुग्णालयाचे कर्मचारी पाहतात. मात्र कर्मचाऱ्यांना याचे प्रशिक्षण नसल्याने बऱ्याचवेळा अडचणी निर्माण होतात. याबाबत अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी सांगितले की, मेडीसिन विभाग इमारतीचा वापर रुग्णावर उपचार करण्यासाठी होतो मात्र ,दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तर लिफ्ट दुरुस्ती विदयुत विभागाकडे आहे. विदयुत अभियंता यांना लिफ्ट बंद विषयी माहिती दिली आहे. लवकरच दुरुस्त होईल.