आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून दीनदयाळ बँकेची ग्राहकांना दर्जेदार सेवा – अध्यक्षा हेबाळकर

दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

अंबाजोगाई : आधुनिक तंत्रज्ञान स्विकारून दीनदयाळ बँक ग्राहकांना दर्जेदार सेवा देत आहे. भारतीय बील पेंमेंट (बी.बी.पी.एस) सारख्या नव्या सुविधा बँक ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. ग्राहकांना दर्जेदार, तत्पर सेवा व सुविधा दिल्या जातात. आरबीआयच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत कर्ज वाटप करण्यात येते. त्यामुळे गरजू सभासदांना बँकेच्या माध्यमातून आवश्यक निधीची मदत केली जाते. आर.बी. आय.च्या धोरणातील बदलांमुळे नविन शाखा मिळत नाहीत. पं.दीनदयाळजी उपाध्याय यांच्या अर्थसिद्धांतावर बँकेची वेगाने प्रगती आणि विस्तार होत असल्याची माहिती देवून सभासदांना बँकेच्या वतीने 9 टक्के लाभांश जाहिर करण्यात आला. कर्ज हप्ते नियमित भरून सहकार्य करावे असे आवाहन दीनदयाळ नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षा शरयुताई हेबाळकर यांनी केले. त्या बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होत्या.दीनदयाळ नागरी सहकारी बँकेची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.22 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 11 वाजता येथील स्व.गोपीनाथराव मुंडे सभागृह, खोलेश्‍वर महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.

यावेळी व्यासपीठावर बँकेचे उपाध्यक्ष विजयकुमार कोपले, संचालक सर्वश्री रा.गो.धाट, डॉ.दि.ज. दंडे, गौतमचंद सोळंकी, पुरूषोत्तम भुतडा, अ‍ॅड. राजेश्‍वर देशमुख, बिपीन क्षीरसागर, अ‍ॅड.मकरंद पत्की, जयवंत ईटकुरकर (कुलकर्णी),चैनसुख जाजू, राजाभाऊ दहिवाळ, गोविंद कुडके, प्राचार्य किसन पवार, अ‍ॅड.अशोक कुलकर्णी, बँकेच्या तीन शाखेतील सन्मानीय सल्लगार अनिलसेठ पदुकोण, मयुरसेठ शुक्ला (देगलुर),बी.एस. देशपांडे (माजलगाव) आणि डॉ.महादेव रूद्राक्ष (परळी) आदींची प्रमुख उपस्थिती होती. बँकेच्या प्रगतीचा आलेख तथा विस्तृत सांख्यकिय माहितीचा तपशील व सर्व आढावा प्रोजेक्टरवर प्रदर्शीत (पी.पी.टी.) करून दाखविण्यात आला.

बँकेच्या अध्यक्षा शरयुताई शरदराव हेबाळकर यांनी समारोपपर भाषणात सांगितले की,‘विश्‍वास,विकास व विनम्रता’ हे ब्रीद आपला परीचय आहे. याच त्रिसुत्रीनुसार बँकेची गेली 22 वर्षे समाधानकारक वाटचाल सुरू आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने, सदिच्छेने व सक्रिय शुभेच्छांनी बँक 22 वर्षांचा कार्यकाळ प्रगतीचे मार्ग प्रशस्त करीत वाटचाल करते. 9 टक्के इतका लाभांश देत असल्याचे सांगताच उपस्थित सभासदांनी या घोषणेचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. 22 वर्षांत बँकेने आर्थिक,भौगोलीक, सांख्यकिय प्रगती केली. आरबीआयच्या सर्व निकषांची पुर्तता बँकेने केलेली आहे.त्यामुळे बँकेस सुरूवातीपासुन लेखापरिक्षण ‘अ’ वर्ग मिळाला असून तो अबाधित आहे. 22 वे वर्ष संपताना बँकेने भौतिक स्तरावर 495 कोटींहून अधिक एकूण व्यवसायाचा टप्पा पुर्ण केला आहे. बँकेच्या यशात सर्व सभासद, कर्जदार,ठेवीदार या सर्वांचे सहकार्य असल्याची माहिती देवून त्यांनी यावेळी पं.दीनदयाळजी यांच्या एकात्ममानव दर्शनचा पुरस्कार केला. अशी माहिती हेबाळकर यांनी दिली.

या सभेत जनार्धन मुंडे,डॉ.हरिश्‍चंद्र वंगे, प्रा.रामकृष्ण देवशटवार, विलास खाडे या सभासदांनी सभेच्या कामकाजात विविध प्रश्‍न उपस्थित केले.त्या सर्व प्रश्‍नांना मुख्यकार्यकारी अधिकारी सनतकुमार बनवसकर यांनी सकारात्मक उत्तरे देवून सभासदांचे समाधान केले. बँकेच्या 23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला सभासदांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.