नाफेड कडून सोयाबीन, मुग, उडीद खरेदीसाठी “वसुंधरा” ची निवड

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा ; रामप्रसाद दांड यांचे आवाहन

अंबाजोगाई : शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत “वसुंधरा फळे, भाजीपाला व फुले खरेदी विक्री संस्था म;” या संस्थेची अधिकृत नियुक्ती करण्यात आली असून अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन, मुग, उडीद हे धान्य शासनाच्या या अधिकृत केंद्रावरच विक्री करुन या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी रामप्रसाद दांड यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नाफेडने सन २०१९-२० साठी मुग प्रति क्वि. ७,०५०/- रु., उडीद प्रति क्वि.५,७००/- रु. तर सोयाबीन प्रति क्वि.३,७१०/- रु. अशी आधारभुत किंमत ठरवण्यात आली आहे. शासनाने ठरवलेल्या या आधारभुत किंमतीप्रमाणे या खरेदीकेंद्रावर वरील धान्य ऑनलाइन पध्दतीने खरेदी करण्यात येणार आहे. सदरील धान्य विक्रीसाठी आणतांना शेतकऱ्यांनी नोंदणी करीता आधार कार्डची छायांकित प्रत, मुग, उडीद, सोयाबीन या पीकांची पेरणीची नोंद असलेला ७/१२, राष्ट्रीय कृत बँकेत खाते असलेल्या पासबुकची झेरॉक्स, स्वतःचा मोबाईल नंबर आदी कागदपत्रे घेवून एफ. ए. क्यु. दर्जाचा म्हणजेच शेत मालामध्ये कचरा नसलेला, चाळणी केलेला सुका शेतमाल आणावा.

सदरील शेतमालात १२ टक्क्यापेक्षा जास्त आर्दता नसावी. सदरील शेतमालाची इलेक्ट्रॉनिक काट्यावर मोजणी झाल्यानंतरच वजनासह काटापट्टी देण्यात येईल. सदरील शेतमालाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्यामुळे आधारकार्ड बँकेशी संलग्न केलेलेच असावे असे आवाहन नाफेडच्या वतीने रामप्रसाद दांड यांनी केले आहे. या बाबतच्या अधिक माहितीसाठी अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांनी वसुंधरा फळे, भाजीपाला व फुले सहकारी खरेदी विक्री संस्था म; या संस्थेचे अध्यक्ष किशोर परदेशी (९४२२२४२३१६) व सचीव सय्यद मोइनोद्दीन (७५०७५ ००१५०) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.