सैफ अली खान नव्हे, अमृता सिंहला ‘या’ अभिनेत्याशी करायचं होतं लग्न ! पण…

मुुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीत 90 च्या दशकांत आपल्या अभिनयाने मोठा पडदा गाजवणाऱ्या अभिनेत्रींमध्ये अमृता सिंंहच नाव आवर्जून घेतलं जातं. आपल्या अभिनयासोबतच हटके स्टाईलने तिने लोकांची मने जिंकली होती. आज 9 फेब्रुवारीला अमृता सिंह आपला वाढदिवस साजरा करत आहे.

अमृता सिंह तिच्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमीच चर्चेत राहिली. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज अभिनेत्यां सोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी तिला मिळाली.

पाकिस्तानातील हदली येथे जन्मलेल्या अमृता सिंहने 1983 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट ‘बेताब’ होता. या चित्रपटामध्ये ती अभिनेता सनी देओल याच्यासोबत झळकली होती. या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अमृता आणि सनी देओलची जोडी पडद्यावर चांगलीच लोकप्रिय ठरली होती. ‘बेताब’ चित्रपटाच्या कथेसोबतच सनी – अमृताची जोडीही प्रेक्षकांच्या मनाला भिडली. या चित्रपटाच्या यशानंतर दोघांनी आणखी एका चित्रपटात एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला.

या दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान अमृता सनी देओलच्या प्रेमात पडली. अमृताला सनीसोबत लग्न करायचे होते. पण, अमृताची आई रुखसाना सुलताना यांना हे नाते मान्य नव्हते आणि यासाठी त्या वारंवार आपल्या मुलीला नकार देत होत्या. आईने खुपदा समजावून देखील अमृता मागे हटली नाही. आपल्या मुलीचा हट्ट पाहून अमृताच्या आईने माघार घेतली. 

अमृताच्या आईने या नात्याला होकार दिल्यानंतर सनीशी लग्न करण्याविषयी त्यांनी पुढचे पाऊल उचलले. मात्र, यादरम्यान सनी देओलचे लग्न झाल्याचे त्यांना कळाले. सनी विवाहित असल्याचे ऐकून अमृता सिंहला जबर धक्का बसला होता. यातून सावरायला तिला बराच वेळ लागला.

यानंतर अमृताने 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानशी लग्न केले. या जोडीला इब्राहिम अली खान आणि सारा अली खान ही दोन मुले आहेत. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर दोघांचा घटस्फोट झाला. पुन्हा अमृताच्या वाट्याला तेच दुःख आले. अमृताशी वेगळे झाल्यानंतर सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूरशी लग्नगाठ बांधली.