तुर्की – सीरिया भुकंप : मृत्यूचे तांडव सुरुच, मृतांची संख्या 21 हजार पार

AM टीम : तुर्की आणि सीरियात भूकंपामुळे मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. या भूकंपामुळे आत्तापर्यंत 21 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कडाक्याची थंडीमुळे मदत आणि बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे भूकंपाच्या 90 तासांनंतरही मृत्यू तांडव सुरु आहे. कोसळलेल्या इमारतींचा ढिगारा जसजसा बाजूला काढला जातोय, तसतसे मृतदेह बाहेर काढले जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेले लोकं वाचण्याची शक्यता कमी होत आहे. कारण रात्रीचे तापमान शून्याच्या खाली गेल्याने मदतकार्य थांबवावे लागत आहेत.

तुर्कस्तान आणि सीरियातील विनाशकारी भूंकपामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी जगातील अनेक देश पुढे सरसावले आहेत. आतापर्यंत 70 हून अधिक देश मदतीसाठी पुढे आले आहेत. दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, सीरियामध्ये जात आहेत. दरम्यान WHO भूकंपग्रस्त भागात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या कामात व्यस्त आहे.

थंडीमुळे आता अनेक भूकंपग्रस्तांचे जीव धोक्यात आले आहेत. शून्यापेक्षा कमी तापमानात हजारो लोकांना उघड्यावर राहावे लागत आहे आणि त्यांना पिण्याचे पाणीही मिळत नाही. दक्षिण तुर्कीच्या अंताक्या शहरातील रुग्णालयाच्या कार पार्किंगमध्ये, लोकांनी त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह बॉडी बॅगमध्ये ठेवले आणि इतर बेपत्ता नातेवाईकांचा शोध सुरू केला. यावरून भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाचा अंदाज बांधता येतो.

जागितक बँकेने तुर्कीला 1.78 बिलीयन डॉलर्सची आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. अनेक देशांनी तुर्कीस्तान, सीरियाला मदत सामग्री पाठवली आहे. यात अमेरिकेने दोन्ही देशांना 85 मिलियन डॉलर्सची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

दरम्यान भारताने देखील तुर्कीला मदत जाहीर केली आहे. भारताने तुर्कीस्तानात NDRF च्या तीन पथकं तसेच मदतीचं साहित्य पाठवण्यात आले आहे. दरम्यान भारताकडून चालवण्यात आलेल्या मोहिमेसाठी ‘ऑपरेशन दोस्त’ असे नाव देण्यात आले आहे.