मुंबई : मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, अहोरात्र मेहनत करून धडपडणाऱ्या वडिलांची, वडील – मुलाच्या नात्याची विलक्षण गोष्ट ‘घोडा’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेला हा चित्रपट येत्या 17 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार असून, या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आला आहे.
बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण, आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकतात का? परिवाराच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची अनोखी कहाणी ‘घोडा’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक बाप आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित चित्रपट झाले असले, तरी हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. कष्टकरी आणि भांडवलदारी वर्ग यांच्या लढ्यात फुलणारं एक गोड स्वप्न म्हणजे ‘घोडा’ हा चित्रपट आहे.
हृदयस्पर्शी कथानक, कसदार लेखन, उत्तम कलाकार असलेला हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही तितकाच दमदार आहे. अनेक महोत्सवांमध्ये कौतुक झालेल्या ‘घोडा’ या चित्रपटाविषयीचं कुतूहल उत्तम ट्रेलरमुळे आता नक्कीच वाढलं असून, सर्वांनी चित्रपटगृहात जाऊन कुटुंबासोबत आवर्जून बघावा असा हा चित्रपट आहे.
अभिनेता कैलास वाघमारे, अर्चना महादेव, दिलीप धनावडे, राहुल बेलापुरकर, शिवराज नाळे, देवेंद्र देव, प्रफुल्ल कांबळे, वज्र पवार यांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. टी. महेश फिल्म्सच्या टी. महेश आणि अनिल बबनराव वणवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच उमेशचंद्र शिंदे आणि नयन चित्ते सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन टी. महेश यांनी केलं आहे. जमीर अत्तार यांनी कथा आणि गीतलेखन, महेशकुमार मुंजाळे, जमीर अत्तार आणि निलेश महिगावकर यांनी पटकथा लेखन, संवादलेखन निलेश महिगावकर, योगेश एम. कोळी यांनी छायांकन केलं असून, रोहन पाटील यांनी संकलन केले आहे.