स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ? : सर्वोच्च न्यायालयात आजही सुनावणी नाहीच !

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाची वेळ संपल्याने याप्रकरणी सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे आता पुढची सुनावणी कधी होणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज, मंगळवारी सुनावणी होणार होती. चौथ्या क्रमांकावर हे प्रकरण होतं. परंतु, दहा मिनिटे आधी तिसऱ्या क्रमांकाचं प्रकरण संपलं आणि कोर्टाने कामकाजच थांबवलं. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पी.एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, आजचंही कामकाज रखडल्याने आता पुढील सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय, प्रभाग व सदस्यसंख्या पूर्ववत करण्याचा शिंदे – फडणवीस सरकारचा निर्णय, उर्वरित 96 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करायचे की नाही, यासह अन्य मुद्दयांवर अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.

राज्य निवडणूक आयोगाने वाढीव प्रभागसंख्येनुसार प्रभागरचनेचे काम पूर्ण केले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने प्रभागरचनेबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, याप्रकरणी आजतरी सकारात्मक सुनावणी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज याबाबतचा मुद्दाच चर्चेला घेण्यात आला नाही. त्यामुळे या निवडणुका आता पुन्हा लांबणीवर पडल्या असून पुढील सुनवाणीची तारीख कधी जाहीर होतेयं याकडे सर्वांचं लक्ष आहे.