छम्मा – छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकर चा वाढदिवस : बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात केले पदार्पण

मुंबई : हिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा – छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकर चा वाढदिवस. उर्मिलाचा जन्म 4 फेब्रुवारी 1974 मध्ये मुंबई येथे झाला. ‘मासूम’ चित्रपटातील ‘लकडी की काठी… काठी पे घोडा’ गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. आजही उर्मिलाला अनेक जण ‘मासूम’ मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. 

मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरने 1980 साली ‘कलयुग’ नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर 1991 साली पडद्यावर झळकलेल्या ‘नरसिंहा’ या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरूणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. उर्मिलाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत ‘मासूम’ सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली. 

उर्मिलाने रामगोपाल वर्माच्या सोबत जवळपास तेरा चित्रपटात काम केले आहे. यामध्ये अंथम, द्रोही, गायम, अंगनगा ओका राजू (सर्व तेलुगु चित्रपट) होते तर रंगीला, दौड, सत्या, कौन, मस्त, जंगल, कंपनी, भूत आणि आग या चित्रपटातही काम केले आहे. 

एक वेळ अशी होती रामगोपाल वर्मा उर्मिला शिवाय इतर कोणत्याही अभिनेत्रीला संधी देत नव्हते. अशीही चर्चा होती की, रामगोपाल वर्मा यांनी त्यांच्या अंधेरी येथील कार्यालयाला उर्मिला मातोंडकर नाव दिले होते. रामगोपाल वर्मा यांनी तर उर्मिला यांना इतर चित्रपट निर्मात्यांच्या सोबत काम करण्यास मनाई केली होती, अशीही चर्चा त्यावेळी होत होती. आणि त्यामुळे तिला इतर चित्रपट मिळणेही बंद झाले होते.

‘एक हसीना थी’, ‘जुदाई’, ‘पिंजर’ अशाही काही चित्रपटांतूनही तिने अष्टपैलुत्व दाखविले आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत. उर्मिला मातोंडकरने आजोबा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले आहे. 

मोहसीन अख्तर मीर हा उर्मिलापेक्षा 10 वर्ष लहान आहे. मोहसीन अख्तर मीरने 2007 मध्ये घेण्यात आलेल्या मिस्टर इंडिया टॅलेंट हंटमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. ए. आर. रेहमानच्या ‘ताज महल’ या म्युझिक व्हिडिओमध्ये ही मोहसीनेन काम केले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता व तिने उत्तर मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. 

सध्या उर्मिला मातोंडकर ही शिवसेना पक्षासाठी काम करत आहे. चमत्कार, जुदाई, सत्या, चाईना गेट, खूबसुरत, लज्जा, पिंजर हे तिचे गाजलेले विशेष चित्रपट आहेत. आपल्या समुहाकडून उर्मिला मातोंडकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

शब्दांकन : संजीव वेलणकर