औरंगाबाद : मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेची प्रवेशपत्रं, महाएचएसएससी बोर्ड डॉट इन, या संकेतस्थळावर सोमवार दिनांक सहा फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून शाळेच्या स्कूल लॉगिनमधून डाऊनलोड करून घेता येणार आहेत.
ही प्रवेशपत्रं शाळांनी प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, अशी सूचना, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एका पत्रकाद्वारे दिली आहे. यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही वेगळं शुल्क शाळेला घेता येणार नाही.
प्रवेशपत्रामध्ये माध्यम किंवा विषय यात काही दुरुस्त्या असतील तर संबंधित शाळेने विभागीय मंडळात जाऊन त्या दुरुस्त करून घ्यायच्या आहेत. विद्यार्थ्यांचा फोटो, स्वाक्षरी, नाव, जन्मतारीख आणि जन्म स्थळासंदर्भातील दुरुस्त्या या शाळास्तरावरच करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची असल्याचं मंडळानं स्पष्ट केलं आहे.