‘रौंदळ’ चित्रपटातील ‘भलरी…’ गाणं प्रदर्शित : भाऊसाहेब शिंदेंचा हटके अंदाज

सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार म्हणजेच ‘भलरी’. भलरीला आपल्या साहित्यात ‘श्रमगीत’ म्हणूनही विशेष दर्जा आहे. हा लोप पावत चाललेला गीतप्रकार ‘रौंदळ’ सिनेमाच्या माध्यमातून येत आहे.

‘रौंदळ’ ची निर्मिती भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट या संस्थेअंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी, भाऊ शिंदे आणि राईज बिझनेस ग्रुप यांची आहे. रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

गजानन नाना पडोळ दिग्दर्शक आहेत. ‘घे गड्या घे ….भलरी घे …भलरी घे …भलरी घे…’ हे गीत बाळासाहेब शिंदे यांनी लिहिलं असून, हर्षित – अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. गणेश चंदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित – अभिराज यांनी गायले आहे.

भाऊसाहेब शिंदेनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्याच्या साथीला आहे. याखेरीज संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. 

या चित्रपटासाठी सुधाकर शर्मा, डॉ. विनायक पवार यांनीही गीतलेखन केलं असून, सोनू निगम, जावेद अली, स्वरुप खान, दिव्य कुमार यांनी गायली आहेत.  नेहा मिरजकर यांची कोरिओग्राफी असून, पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे आहे. अनिकेत खंडागळे यांची  सिनेमॅटोग्राफी आणि फैझल महाडीक यांचं संकलन आहे.