महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक ‘मूकनायक’ निर्माण झाला पाहिजे : जेष्ठ पत्रकार विलास आठवले

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने ‘मूकनायक’ दिनाचे आयोजन : विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पार पडला गौरव सोहळा

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील प्रत्येक घरात एक ‘मूकनायक’ निर्माण झाला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार विलास आठवले यांनी व्यक्त केले. अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने नगरपरिषदेच्या विलासराव देशमुख सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात विलास आठवले बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी तर प्रमुख अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे होते.

अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘मूकनायक’ पत्रकारिता पुरस्कार विलास आठवले यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देताना विलास आठवले बोलत होते. 

आपल्या विस्तारीत भाषणात आठवले पुढे म्हणाले की, वडिलांनी मला शिकवून मोठे करण्याचा, उच्चपदस्थ अधिकारी बनवण्यासाठी खुप प्रयत्न केला. पण, ते शक्य झाले नाही. 10 वी 12 वी आणि आयटीआयचे जेमतेम शिक्षण घेतल्यानंतर मला पत्रकारितेत काम करण्याची संधी मिळाली आणि मी पत्रकारितेकडे वळलो. 32 वर्षापुर्वी अंशकालीन पत्रकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली, सतत वेगळे काही तरी करण्याचा प्रयत्न करीत गेलो आणि पत्रकारितेतचं स्थिरस्थावर झालो. 

प्रत्येकालाच त्यांच्या आयुष्यात असे काही तरी करण्याची संधी मिळत असते. आपल्या आवडत्या क्षेत्रात असे काही तरी करण्याची संधी प्रत्येकाने शोधली पाहिजे आणि या संधीचे सोनं करीत आपले आयुष्य घडवले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पत्रकारितेचा कसलाही वारसा, कसलाही अभ्यास नसतांना आपण पत्रकारितेत आलो, सतत नवीन काही तरी शिकत गेलो. स्वतः वर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करीत गेलो. स्वतः वरील अन्याय, अत्याचार दुर करण्याची ज्यांच्यामध्ये क्षमता आहे, तोच ‘मूकनायक’ होवू शकतो, असे सांगत राज्यातील प्रत्येक घराघरातील मुलांनी अन्याय, अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ‘मूकनायक’ बनले पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या शिदोरीवर आपण आजपर्यंत ताठ मानेने जगत आलो याचा आपल्याला अभिमान असून ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या वृत्तपत्राच्या नावाने हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे, तो पुरस्कार घेण्याची संधी मी कशी सोडेल असे सांगत ‘मूकनायक’ हा राज्यस्तरीय पुरस्कार देवून आपला गौरव केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले.

आपल्या भाषणाच्या शेवटी विलास आठवले यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार कधी मरणार नाही, कधी मरु देणार नाही अशा पध्दतीने काम करण्याची तयारी समाजातील तरुणांनी केली पाहिजे असे भावनिक आवाहनही केले.

या कार्यक्रमात ‘आउट्स्टैन्डिंग टिचर अवॉर्ड’  प्राप्त गौरवमुर्ती ‘स्वाराती’ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे यांनी आपल्या भाषणात या पुरस्काराचा उल्लेख करीत अंबाजोगाई सारख्या ग्रामीण भागातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचा कार्यभार सांभाळत असतांना सुध्दा देशपातळीवरील संघटना मला हा पुरस्कार देण्यासाठी निवड करते, हा वैद्यकीय महाविद्यालयाचा आणि अंबाजोगाई शहराचा गौरव आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले तर अध्यक्षीय समारोप करताना माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी आपल्या भाषणात विलास आठवले यांच्या पत्रकारितेचा गौरव करीत आठवले यांचे पत्रकारितेतील दिशादर्शक काम नवोदित पत्रकारांना सतत बळ देत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सर नागेश जोंधळे, डॉ. राहुल धाकडे,  ओंकार रापतवार, डॉ. वैष्णवी गायकवाड, गौरी प्रशांत बर्दापूरकर, वृक्षमित्र सुधाकर देशमुख, चैत्राली हजारे, शैलेश पारसे, बालशाहीर अविष्कार एडके, चित्रा पाटील, सृष्टी गणेश शेटे, सुनिल होळंबे, विश्वराज देशमुख, रिध्दीमा अभिजित सांगळे, राजू वाघमारे यांचा शाल, स्मृतीचिन्ह देवून गौरव करण्यात आला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंबाजोगाई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महादेव गोरे यांनी केले तर सूत्रसंचालन सुधाकर देशमुख यांनी केले. विलास आठवले यांचा परिचय व आभार परमेश्वर गित्ते यांनी मानले. सन्मान पत्राचे वाचन रोहिदास हातागळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे जेष्ठ सदस्य जगन सरवदे, प्रदीप तरकसे, दादासाहेब कसबे, धनंजय जाधव, गणेश जाधव, विश्वजीत गंडले, दत्ता वालेकर, रवी अरसुडे, रतन मोती, प्रवीण कुरकुट, प्रविण दासुद यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.