टीम AM : जेष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 1 फेब्रुवारी 1960 रोजी झाला. आपली भाषा आणि बोलण्याच्या लहेजामुळे हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे जॅकी श्रॉफ आजही नेटकऱ्यांमध्ये ‘आपना भिडू’ नावाने लोकप्रिय आहेत. ‘हिरो’ सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करणाऱ्या जॅकी श्रॉफ यांचा जन्म गुजराती कुटुंबात झाला होता.
जॅकी श्रॉफ यांचे पूर्ण नाव जय किशन श्रॉफ. सिनेमांत झळकण्यापूर्वी जॅकी यांनी काही जाहिरातीत काम केले होते. सुभाष घई यांनी जॅकी श्रॉफ यांना ‘हिरो ‘ या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये लॉन्च केले. या सिनेमात त्यांचे नाव जॅकी होते. जॅकी श्रॉफ यांच्या या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. जॅकी श्रॉफ यांचा अभिनेता म्हणून पहिला सिनेमा ‘हीरो’ होता. मात्र, त्यापूर्वी त्यांनी ‘स्वामी दादा’ या सिनेमाद्वारे फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.
1983 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात जॅकी, देव आनंद यांच्यासह झळकले होते. जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत, ज्यांनी हिंदीसह तब्बल आठ भाषांमध्ये काम केले. त्यांनी बंगाली, तेलगु, मल्याळम, कन्नड, मराठी, तामिळ, पंजाबी आणि उडिया या सिनेमांत अभिनय केला आहे.
ऐंशीच्या दशकात त्यांनी आयशा दत्तसह लग्न केले. जॅकी श्रॉफ यांना आपल्या फिल्मी करिअरमध्ये तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना हिंदी सिनेसृष्टीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी स्पेशल ऑनर ज्युरी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. ‘रंगीला’ या सिनेमात जॅकी श्रॉफ यांनी आमिर खानसोबत काम केले होते. त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी ‘धूम 3’ या सिनेमात जॅकी आणि आमिर यांनी एकत्र काम केले.
चार दशकांपासून मनोरंजन सृष्टीत असणाऱ्या जॅकी श्रॉफ यांनी 220 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. जॅकी श्रॉफ यांनी आपल्या पत्नीसह मिळून एक मीडिया कंपनी सुरु केली होती. आपल्या समुहाकडून जॅकी श्रॉफ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..
शब्दांकन : संजीव वेलणकर