स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृतिदिन : मुंबईत ‘रेडियो आर्टिस्ट’ म्हणून केले काम

मुंबई : अपार कष्ट, अजोड मेहनत आणि अखंड ध्यासाच्या जोरावर भारतीय शास्त्रीय संगीत कंठस्थ करुन, आपल्या कसलेल्या, घनगंभीर आणि भावस्पर्शी आवाजात शास्त्रीय आणि सुगम संगीत रसिकांच्या हृदयस्थ करणाऱ्या जागतिक कीर्तीच्या आणि 2008 साली भारतरत्न पुरस्कारानी सन्मानित स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांचा आज स्मृतिदिन. 

लहानपणापासूनच संगीतामध्ये रस असणाऱ्या पंडितजींची कल्याण, तोडी, पुरिया, मुलतानि इ. प्रसिद्ध ‘रागांवर विशेष पकड होती. तसेच ते ठुमरीही अतिशय छान गात होते. ‘संतवाणी’ या नावाने मराठी अभंग गायनाचे त्यांनी हजारो कार्यक्रम केले आणि ते लोकप्रिय झाले.

तसेच पंडित भीमसेन जोशी यांनी ‘तानसेन’, ‘सुर संगम’, ‘बसंत बहार’ आणि ‘अनकही’ सारख्या अनेक सिनेमांसाठी गायन केले. त्यांनी गायलेली ‘पिया मिलन की आस’, ‘जो भजे हरि को सदा’ आणि ‘मिले सुर मेरा तुम्हारा’ इ. सदाबहार गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. 

मुंबईत ‘रेडियो आर्टिस्ट’ म्हणून देखील त्यांनी काम केले. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारतरत्न, पद्म विभूषण, पद्म भूषण तसेच पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.