दहावी – बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण : यंदा ‘होम सेंटर’ नाही – शिक्षण उपसंचालक

औरंगाबाद : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी – बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे यावर्षी दहावी – बारावीच्या परीक्षेसाठी असणारे ‘होम सेंटर’ यंदा नसणार आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली आहे.

बी. बी. चव्हाण यांनी सांगितले की, यंदा सर्व शाळा आणि कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. परीक्षेसाठी 100 टक्के अभ्यासक्रम असणार आहे. कोरोना काळामध्ये मिळालेला वाढीव वेळ आता यावर्षी विद्यार्थ्यांना मिळणार नाही. कारण कोरोना आता कमी झाला आहे. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी जशा नियमित परीक्षा होत होत्या. त्याप्रमाणे यावर्षी परीक्षा होणार आहेत, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी. यासाठी दहावी – बारावीचे लेखी परीक्षेचा अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे. 

बारावीची परीक्षा मंगळवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 ते मंगळवार दिनांक 21 मार्च या काळात होणार आहेत. त्याचबरोबर दहावीच्या परीक्षा गुरुवार दिनांक 2 मार्च 2023 ते शनिवार 25 मार्च या कालावधीत होतील.