अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना ‘आउट्स्टैन्डिंग टिचर’ अवॉर्ड

अंबाजोगाई : येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ॲन्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह (ISCKRS) सर्जन यांच्या तर्फे ‘आउट्स्टैन्डिंग टिचर’ अवॉर्ड हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ॲन्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह सर्जन ही संस्था देशातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील एक मान्यवर संस्था असुन वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या टिचर्स् चा शोध घेवून त्यांना हा ‘आउट्स्टैन्डिंग टिचर’ अवॉर्ड पुरस्कार देवून सन्मान करीत असते.

या वर्षीचा हा पुरस्कार येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना जाहीर झाला असून येत्या 27 जानेवारी रोजी गोवा येथील हॉटेल मेरक्युअर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ कॉर्निया ॲन्ड केरॅटोरिफरॅक्टिव्ह सर्जन संघटनेचे अध्यक्ष डॉ. जिवन टिटीयाल आणि सचिव डॉ. राजेश दरक यांनी दिली आहे.

सदरील ‘आउट्स्टैन्डिंग टिचर’ अवॉर्ड मिळाल्याबद्दल अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांचा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मेडिसीन विभागाचे प्रमुख डॉ. सिध्देश्वर बिराजदार, प्रा. मेजर शांतीलाल बनसोडे, प्रा. पंडीत कराड, चंद्रशेखर वडमारे, डॉ. राकेश जाधव, डॉ. विनोद वेदपाठक, ज्येष्ठ पत्रकार सुदर्शन रापतवार आणि इतर मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन अभिनंदन केले आहे.