‘क्रांतीनगर’ मधील नागरिकांचा रस्त्यासाठी ‘आक्रोश’ मोर्चा

उपजिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

अंबाजोगाई : शहरातील क्रांतीनगर परिसरातील शेकडो नागरिकांचा रस्त्यासाठी  ‘आक्रोश’ मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला.

‘स्वाराती’ रुग्णालय परिसरातून क्रांतीनगरकडे जाणारा धोबीघाट मार्गे असलेला रस्ता रुग्णालय प्रशासन संरक्षण भिंतीच्या नावाखाली बंद करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे क्रांतीनगर परिसरातील जनता अस्वस्थ झाली आहे. मुळात हा रस्ता मोरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल ने – आण करण्यासाठीचा बांध गाव रस्ता असुन गेल्या कित्येक वर्षांपासून तो वापरात आहे.

सदरिल रस्ता कायमचा बंद झाल्यास शेतकऱ्यांसह क्रांतीनगरच्या नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे. यामुळे हा रस्ता आहे तसाच कायम ठेवुन रस्ता दुरुस्त करण्यात यावा, यासाठी क्रांतीनगर येथील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात क्रांतीनगर परिसरातील लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी प्रशासनाला निवेदनही देण्यात आले. मोर्चेकऱ्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.