नगरपरिषदेने तात्काळ उपाययोजना कराव्यात : माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी
अंबाजोगाई : नगरपरिषदेच्या स्वच्छता कंत्राटदाराचे काम बंद असल्याने शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगरपरिषदेने यावर तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात मुख्याधिकारी यांंना देण्यात आलेेल्या निवेदनात म्हणटले आहे की, नगरपरिषदेच्या स्वच्छता कंत्राटदाराचे काम बंद झाल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून जागोजागी कचऱ्याचे ढीग पडले आहेत. तसेच शहरातील प्रत्येक वार्डातील नाल्या पुर्ण भरल्या असून यातील पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी आम्ही या अगोदरही निवेदन दिले होते, परंतू, आपण याची दखल घेतली नाही.
तोंडी विनंती केली असता स्वछता कर्मचारी कामे ऐकत नसून टाळाटाळ करत आहेत. घंटागाड्याही बंद असल्याने घरोघरी कचरा जमा राहिल्याने नागरिकांचा संताप होतोय. यावर आपण तात्काळ उपाययोजना करुन स्वच्छतेची कामे तात्काळ करण्यात यावीत, अन्यथा येणाऱ्या 4 – 5 दिवसात आपल्या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल.
या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी, बालासाहेब पाथरकर, माजी नगरसेवक शेख खलील, शेख जलील, शेख ताहेर यांच्या सह्या आहेत.