‘वाळवी’ प्रदर्शनास सज्ज : ट्रेलर लॉन्च, 13 जानेवारीला प्रदर्शित

मुंबई : ‘वाळवी’ या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. यावेळी ‘वाळवी’ चे नवीन पोस्टरही झळकले. यात स्वप्नील जोशी, सुबोध भावे, अनिता दाते, शिवानी सुर्वे एका वेगळ्याच अंदाजात दिसत असून त्यांच्या व्यक्तिरेखा, चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिकच वाढवणाऱ्या आहेत. हा मराठीतील पहिला थ्रिलकॅाम चित्रपट आहे. 

ट्रेलरमध्ये स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको दिसत असून ते आत्महत्या करण्याचा निर्णय घेत आहेत. मात्र, हा स्वप्नीलने आखलेला डाव असून यात त्याला शिवानी मदत करत असल्याचे दिसतेय. हे सगळं होत असतानाच सुबोध त्यांना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्षणोक्षणी कुतूहल वाढवणारा आणि  गूढ असणाऱ्या ‘वाळवी’ त स्वप्नील आणि शिवानीचा मनसुबा पूर्ण होणार की, आखलेला डाव फिरणार ? सुबोधकडे असे नक्की काय गुपित आहे ? ‘वाळवी’ चा या सगळ्याशी काय संबंध ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला 13 जानेवारीला  मिळतील.

‘दिसतं तसं नसतं’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. दिग्दर्शक परेश मोकाशी म्हणतात,  झी स्टुडिओज् सोबत काम करण्याचा अनुभव हा  अप्रतिम असतो. ‘वाळवी’ एक वेगळा विषय आहे. शेवटपर्यंत खुर्चीला खिळवून ठेवणारा हा चित्रपट आहे. अनेक तर्कवितर्क लावत असतानाच चित्रपटातील गूढ अतिशय अनपेक्षितपणे उलगडणार आहे. झी स्टुडिओज् आणि मधुगंधा कुलकर्णी यांनी  निर्मिती केली असून या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सवांद परेश मोकाशी आणि मधुगंधा कुलकर्णी यांचे आहेत. झी स्टुडिओज् आणि परेश मोकाशी यांनी  हरीशचंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि चि. व चि. सौ. का. असे  चित्रपट दिले आहेत.